आविष्कार देशमुख, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : जगप्रसिद्ध नागपुरी संत्र्याचे उत्पादन आता कमी झाले आहे. कधी अवकाळी पावसाचा फटका तर कधी संत्र्यांवरील रोगराईमुळे नागपूरची संत्री आता संकटात सापडली आहेत. संत्रानगरी अशी ओळख असलेल्या नागपुरी संत्र्यांना गतवैभव परत मिळवून देण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे आहे.

एकेकाळी ४० हजार रुपये टनापर्यंत विकल्या जाणाऱ्या संत्र्याचे दर यंदा दहा हजार रुपये टनापर्यंत खाली उतरले आहेत. विदर्भात काटोल, नरखेड, मोर्शी, वरुड, परतवाडा येथे मोठय़ा प्रमाणात संत्र्यांचे उत्पादन होते. ही संत्री नागपूरच्या कळमना येथीळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येतात. हा रसाळ संत्रा आकाराने मोठा असतो. या संत्र्याला देशाच्या विविध राज्यातून मोठी मागणी असते. जवळपास ३३ ते ४० हजार रुपये प्रति टन संत्रा विकला जातो. त्यामुळे उत्पादकाला चांगली मिळकत मिळते. यंदाही आंबिया बहार चांगला आल्याने उत्पादकांना चांगल्या मिळकतची आशा होती. मात्र अचानक आलेल्या अवकाळी पावसाने आणि त्यासोबत झालेल्या गारपिटीमुळे बहुतांश संत्रा गळून पडला. मार लागलेला आणि आकाराने छोटा असलेला संत्रा बाजारात आला. मात्र त्याला खरेदीदार मिळत नसल्याने उत्पादकांना आपले दर कमी करावे लागले.

दर इतके कमी करावा लागले की त्यांचा उत्पादानाचाही खर्च निघाला नाही. १२ ते १५ रुपये डझन भाव खाली उतरल्यानंतरही संत्री विकली जात   नाही. कृषी उत्पन्न बाजारात समितीमध्ये दररोज संत्र्यांच्या १०० छोटय़ा मोठय़ा गाडय़ांची आवक होत असून मालाला मात्र उचल नाही. गारपीट, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, अवकाळी पाऊस, रोगराई अशा नैसर्गिक आपत्तीमुळे संत्र्याचे उत्पादन घटले आहे.

शासनाकडून शेतकऱ्यांना केवळ हेक्टरी जेमतेम मदतीचे आश्वासन मिळत असून ठोस मदत मिळताना दिसत नाही. नागपूर जिल्ह्य़ात ३५ हजार तर अमरावती जिल्ह्य़ात ९० हजार हेक्टर जमिनीवर संत्र्यांचे उत्पादन घेण्यात येते.

संत्र्यावर आधारित प्रकल्पाची गरज

अवकाळी पाऊस व गारपीट होत असल्याने संत्रा मार खातो आणि डाग लागल्याने खरेदीला ग्राहक मिळत नाही. अशात शेतकऱ्यांना मातीमोल भावाने संत्रा विकावा लागतो. यामध्ये मोठे नुकसान होते. संत्रा तोडणीलाही परवडत नाही. या परिस्थितीवर मात करण्यासाठी विदर्भात संत्र्यावर आधारित प्रकल्पाची नितांत गरज आहे. मात्र दुर्दैवाने विदर्भात एकही प्रकल्प नाही. अवकाळी पावसामुळे मार बसलेल्या संत्र्यांपासून ज्युस, किंवा संत्र्यांच्या सालीपासून सौंदर्य प्रसाधने, साबण किंवा ऑरेंज इसेन्स व पल्प सहज तयार करता येऊ शकतात. मात्र येथील कृषी अधिकारी आणि पुढाऱ्यांनी असा प्रकल्प सुरू व्हावा यासाठी कोणतेही कष्ट घेतले नसल्याने आज नागपूरच्या संत्र्याला असे वाईट दिवस आले आहेत. उत्पादकांची क्रय शक्ती कमी झाली आहे. शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शनासह येथील संत्रा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात होणे आवश्यक आहे.

-अमिताभ पावडे, कृषी अभ्यासक.

विधानसभेत संत्र्यावर चर्चाच होत नाही

काटोल येथील डोंगरगांव येथे सुरू करण्यात आलेला संत्रा प्रकल्प बंद पडला आहे. सरकार संत्र्याविषयी गंभीर नाही. विदर्भातील पुढारी विधानसभेत संत्र्यावर बोलायला तयार नाहीत. गारपिट झाल्यावर नुकसानभरपाई मिळत नाही. ऑनलाइन संत्र्याची विक्री बंद झाली आहे. व्यापाऱ्यांवर नियंत्रण राहिले नसल्याने शेतकऱ्यांची लूट सुरू आहे.

-सुनील शिंदे, माजी आमदार व संत्रा उत्पादक.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Climate change hits nagpur orange zws
First published on: 13-02-2020 at 00:05 IST