अकोला : ढगफुटी सदृश्य पावसाने अकोला शहरासह जिल्ह्यातील विविध भागाला अक्षरश: झोडपून काढले. वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह गुरुवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे दाणादाण उडाली. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले असून सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पावसामुळे गणेशोत्सवात जलमय वातावरण झाले. नदी, नाले भरभरून वाहत असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला.
अकोला जिल्ह्यात गेल्या काही दिवसांने पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे वातावरणात उकाडा वाढला होता. गणरायासोबतच पावसाचे देखील आगमन झाले. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. काळी भागात पावसाची रिपरिप सुरुच होती. बुधवारी विविध भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १६.८ मि.मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये अकोट ३८.६, तेल्हारा ११.८, बाळापूर ३.९, पातूर १५.४, अकोला २४.६, बार्शीटाकळी ८.९ आणि मूर्तिजापूर तालुक्यात ५.४ मि.मी. पाऊस पडला आहे.
गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अचानक ढग दाटून आले. मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तास हा मुसळधार पाऊस सुरूच होता. या जोरदार पावसामुळे शहरातील सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. नाल्याचे पाणी रस्त्यावर आले. मोठी वृक्ष उन्मळून पडली. ऐन गणेशोत्सवात ढगफुटी सदृश्य पावसाचा मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे शहरातील नागरिकांची धावपळ झाली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र आहे.
महानगरपालिकेच्या यंत्रणा तातडीने कामाला लागल्या असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शहराच्या विविध भागातील वीज पुरवठा खंडित झाला. अनेक ठिकाणी वीजवाहिन्या तुटल्या आहेत. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे.
पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज
अकोला जिल्ह्यात ३० ऑगस्टपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. पावसामुळे नदी, नाले व तळ्यांतील पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे पाण्यात शिरण्याचे अनावश्यक धाडस करू नये. पूर आलेल्या रस्त्यावरून गाडी चालविणे टाळावे. पाणीसाठ्याजवळ जाऊ नये. वीज व पावसापासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यात यावा. या परिस्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये. नदीकाठाजवळील गावातील गावकऱ्यांना सतर्कतेची सूचना देण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.