चंद्रपूर : दहावी व बारावीत शिकवणी वर्गाचे ‘एजंट’ घरोघरी फिरून विद्यार्थी गोळा करतात तीच वेळ आता जिल्ह्यातील अभियांत्रिकी, कला, वाणिज्य, विज्ञान, बीसीए, परिचारिका, समाजकार्य, पॉलिटेक्निक, एमबीए, बी.एड. तथा इतर अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांवर आली आहे. गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थी पटसंख्या सातत्याने कमी होत असल्याने महाविद्यालयांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. यावर उपाय म्हणून ‘कमिशन एजंट’ ही संकल्पना समोर आली आहे. चंद्रपुरात बहुसंख्य महाविद्यालयांचे ‘कमिशन एजंट’ विद्यार्थी गोळा करीत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांचे विद्यापीठाकडे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. त्यातच कुलगुरू ठराविक विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी सातत्याने त्याच विचारांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात व्यस्त आहेत. उच्च शिक्षणासाठी कमी व नोकरभरती, क्रीडा स्पर्धेतील गैरव्यवहार, जमीन खरेदी गैरव्यवहार तसेच इतर वादग्रस्त विषयांसाठीच विद्यापीठ राज्यभर चर्चेत आहे.
परिणामी गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थी संख्या झपाट्याने कमी होत आहे. विद्यापीठाच्या पदवीला मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई तसेच इतर मोठ्या शहरांत महत्त्व दिले जात नाही. यामुळेही विद्यापीठात विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पालक तयार नाहीत. बरेच विद्यार्थी मोठ्या शहरांकडे वळले आहेत. चंद्रपुरातून दहावी व बारावीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर मोठ्या शहरांतील महाविद्यालयात हे विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यामुळे स्थानिक महाविद्यालयांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे.
अशात महाविद्यालय सुरू ठेवण्यासाठी विद्यार्थी पटसंख्या कायम ठेवण्याचे आवाहन संस्थाध्यक्ष, प्राचार्य यांच्यापुढे आहे. त्यामुळे विद्यार्थी गोळा करण्यासाठी शहरातील नामांकित संस्था, महाविद्यालयांनी ‘कमिशन एजंट’ नियुक्त केले आहे. या ‘कमिशन एजंट’ला एका विद्यार्थ्यामागे ठरावीक कमिशन दिले जाते. हे कमिशन मिळावे यासाठी एजंट घरोघरी फिरून विद्यार्थी गोळा करीत आहेत. केवळ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयच नाही, तर अभियांत्रिकी, एमबीए, परिचारिका, बीएएमएस, आयुर्वेदिक महाविद्यालय, बीएड व इतरही महाविद्यालयांनी अशाच प्रकारचे एजंट नियुक्त केले आहे.
अभियांत्रिकी व बीएएमएस, आयुर्वेदिक महाविद्यालयासाठी ‘सीईटी’ तसेच इतर परीक्षा द्यावी लागते. या महाविद्यालयांनी अभियांत्रिकीचे ‘सीईटी’ परीक्षा दिलेले विद्यार्थी मिळावे, यासाठीही दलालांमार्फत प्रयत्न सुरू केले आहेत. शहरातील प्रत्येक प्रभाग, वॉर्डात महाविद्यालयांचे एजंट फिरताना दिसतात. गोंडवाना विद्यापीठाची प्रत खालावल्याने स्थानिक महाविद्यालयांवरदेखील ही वाईट वेळ आली आहे. काही महाविद्यालयांनी तर विद्यार्थ्यांना बससेवा, शिक्षण शुल्क माफी, या सुविधा देण्याची तयारीदेखील दर्शवली आहे. विशेष म्हणजे, सर्व सुखसुविधा देऊनही महाविद्यालयांना विद्यार्थी मिळत नसल्याने प्राचार्य व प्राध्यापक चिंतेत आहेत.
‘विद्यार्थी आणा अन्यथा नोकरी सोडा’
अनेक महाविद्यालयांनी या कामांत प्राचार्य, तासिका प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही गुंतवले आहे. विद्यार्थी आणा, अन्यथा नोकरी सोडा, असा थेट इशाराच प्राध्यापकांना देण्यात आला आहे. नोकरीच्या भीतीने प्राध्यापकदेखील विद्यार्थी शोधमोहिमेत गुंतले आहेत. अनेक महाविद्यालयांनी समाज माध्यमांवर जाहिरात करणे सुरू केले आहे. दरवर्षी बारावीत हजारोंच्या संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण होत असताना आणि बहुसंख्य विद्यार्थी बाहेर जिल्ह्यात जात असल्याने स्थानिक महाविद्यालयांवर ही वेळ आली आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंनी ठराविक विचारांचा प्रचार-प्रसार करणारे कार्यक्रम घेण्याऐवजी विद्यापीठाला वळण, शिस्त लावावी, जेणेकरून विद्यार्थी बाहेर जिल्ह्यात जाणार नाहीत, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.