चंद्रपूर: अकरावी वर्गाचा प्रवेश यावर्षी ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. दहावीचा निकाल लागला असला तरी गुणपत्रिका अद्याप मिळालेली नसल्याने आणि प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी १९ ते २९ मे या दहा दिवसांच्या कालावधीत असल्याने आणि त्याबाबत शिक्षण विभागाने जनजागृती केली नाही.

दहावीच्या सीबीएससी, आयसीआयसी आणि महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेचे निकाल लागले आहेत. मात्र अद्यापही विद्यार्थ्यांना गुणपत्रिकाच मिळालेल्या नाहीत. आजवर अकरावीचे प्रवेश महाविद्यालयस्तरावर होत होते मात्र या वर्षीपासून राज्याच्या शिक्षण मंडळाने अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी करून प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिक्षण विभागाकडून सबंधित मुख्याध्यापकांना माहिती देण्यात आली. मुख्याध्यापकांनी या ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेबाबत विद्यार्थ्यांना माहिती देऊन जागृती करावे असे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात दहावीचे निकाल लागले तरी शहरी व ग्रामीण भागात अनेकांना याबाबत माहिती नाही.

येत्या १९ मे पासून चंद्रपूर जिल्ह्यात अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू होणार असून ती २९ मे पर्यंत चालणार आहे. या दहा दिवसात जिल्हाभरातील विद्यार्थ्यांची नोंदणी होईल का याबाबत साशंकता आहे. अनेक महाविद्यालयानी आपले महाविद्यालयाचे नाव देखील ऑनलाईन मध्ये नोंदविलेले नाही. आता नाव नोंदणीसाठी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू आहे. ऑनलाईन प्रवेशाची नोंदणी सबंधित महाविद्यालयामध्ये करता येईल अशा सूचना होत्या मात्र महाविद्यालयांकडून या ऑनलाईन प्रवेशसाठी नोंदणी केंद्रच उघडलेले नाहीत, असेही सांगण्यात येत आहे.

यासंदर्भात चंद्रपूरचे शिक्षणाधिकारी राजेश पातळे यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, यावर्षीपासून अकरावीसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांचा फायदा असून त्यांना १० महाविद्यालयांचे नाव निवडता येणार आहे. गुणवत्तेनुसार त्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे. मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांना यासंदर्भात माहिती झालेली नाही हे खरे आहे. त्यासाठी सर्व मुख्याध्यापकांची आता कार्यशाळा घेणार आहोत. त्यानंतर पालक व विद्यार्थ्यांना याची सर्व माहिती मिळेल असा विश्वास शिक्षणाधिकारी राजेश पातळे यांनी व्यक्त केला.

दरम्यान आतापर्यंत २२० महाविद्यालयांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. उपसंचालक कार्यालयाकडून नोंदणी केलेल्या यादींची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थांसाठी प्रवेश प्रक्रिया खुली होणार आहे. दहावीच्या गुणवत्तेवरच प्रवेश होणर आहे. नोंदणी केलेल्या महाविद्यालयांमध्ये केवळ राज्य शासनाशी संलग्न महाविद्यालयांचा समावेश आहे. सीबीएससी केंद्रीय बोर्डाचे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचा या यादीत समावेश नाही. पूर्वी मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरात याच पध्दतीने प्रवेश व्हायचे, आता चंद्रपुरात देखील ही पध्दत सुरू झाली असून गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेमुळे चांगले महाविद्यालय मिळेल असा विश्वास शिक्षणाधिकारी पातळे यांनी व्यक्त केला.

१९ मे पासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र गुणपत्रिका विद्यार्थ्यांना मिळालेल्या नाही. शिक्षण विभाग म्हणतो आम्ही मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेऊ , दोन दिवसांवर प्रवेश प्रक्रिया आली असतांना कार्यशाळा कधी घेणार असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक या निर्णयामुळे चिंताग्रस्त आहेत.