यवतमाळ : शहरामध्ये वादग्रस्त ठरलेले नगर परिषद मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्यावर निलंबनाची कारवाई न करता त्यांना अभय देण्याचा प्रकार स्थानिक आमदार मदन येरावार यांनी केल्याच्या निषेधार्थ शहर काँग्रेस कमिटीतर्फे अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.

यवतमाळ नगर परिषद घनकचरा निविदा प्रक्रियेमधील भ्रष्टाचार विधान परिषदेत गाजला. या प्रकरणामधील चौकशी अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविण्यात आला. आठ दिवसांत कारवाई करणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी नागपूर अधिवेशनात सांगितले होते. सभापती निलम गोरे यांनी सदर प्रकरण ‘डाऊन टू अर्थ’ असल्याचे सांगत विभागीय आयुक्तांनी कारवाईची सुचना केली असल्यामुळे अधिवेशन संपण्यापूर्वीच कारवाईची अपेक्षा व्यक्त केली होती.

हेही वाचा – गडचिरोली : भरधाव दुचाकीची ट्रकला धडक; तीन तरुणांचा मृत्यू

दुसरीकडे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांना पदोन्नती देऊन त्यांना यवतमाळ जिल्ह्यातच नियुक्ती देण्यासाठी आमदार मदन येरावार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले. डोल्हारकर यांची बदली जिल्हा सहआयुक्त, नगर परिषद प्रशासन अधिकारी, यवतमाळ या रिक्त पदावर करण्याची विनंती केली आहे. हा सर्व प्रकार यवतमाळकरांच्या जखमेवर मीठ चोळणारा असल्याची प्रतिक्रिया शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चंदू चौधरी यांनी दिली आहे.

मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर हे कचरा घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहे. कामे वाटपातसुद्धा अनियमितता केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात कंत्राटदार संघटना न्यायालयात गेली आहे. याशिवाय मुख्याधिकाऱ्यांनी नुकतीच मालमत्ता करामध्ये प्रचंड वाढ केल्याने नागरीक तीव्र नाराज आहेत. या निर्णयाविरोधात काँग्रेसने नगर परिषदेसमोर धरणे आंदोलन केले.

हेही वाचा – वर्धा : रोटरीची व्यापार खेळी अन् कचरा बसला खेळाडूंच्या गळी, मैदान झाले डम्पिंग ग्राउंड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्धनग्न आंदोलनात अनेक कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन पाठिंबा दिला. जोपर्यंत मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्यावर निलंबनाची कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. भविष्यात मुख्याधिकारी व स्थानिक आमदारांना जनतेसमोर उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चंद्रशेखर चौधरी, जि.प. माजी अध्यक्ष प्रविण देशमुख, युवा नेते ओम तिवारी, कैलाश सुलभेवार, विशाल पावडे, प्रियंका बिडकर, मनिषा देशमुख, विद्या राठोड, अजय किनीकर यांच्यासह काँग्रेस कार्यकत्यांनी दिला.