नागपूर : महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या नेतृत्वाखाली दीक्षाभूमी ते सेवाग्राम दरम्यान होणाऱ्या संविधान सत्याग्रह पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने नागपुरात भव्य मशाल यात्रा आणि जाहीर सभेचे आयोजन केले आहे. रविवार, २८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता ही मशाल यात्रा व्हेरायटी चौकातून सुरू होऊन संविधान चौकात सांगता होईल. यानंतर संविधान चौकात एक जाहीर सभा पार पडणार आहे.
काँग्रेस प्रदेश कमिटीने दिलेल्या माहितीनुसार, भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त ही मशाल यात्रा संविधान रक्षणाच्या उद्देशाने काढण्यात येत आहे. भारताचे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जाती-धर्मांना समान अधिकार देण्यासाठी तयार केले. मात्र गेल्या काही वर्षांपासून संविधानावर सातत्याने आघात होत असून, मूलभूत हक्क आणि लोकशाही मूल्यांवर संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे देशातील संविधान रक्षणासाठी जागरूकता वाढवण्याचे आणि संघर्षाचे आंदोलन आता गरजेचे असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
याच पार्श्वभूमीवर २९ सप्टेंबरपासून दीक्षाभूमी ते सेवाग्राम आश्रम दरम्यान ‘संविधान सत्याग्रह पदयात्रेचे’ आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेचा शुभारंभ सोमवार, २९ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीवरून होणार आहे. यात्रेच्या प्रारंभी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, तुषार गांधी यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते, सर्व ब्लॉक अध्यक्ष, माजी नगरसेवक, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल व इतर आघाड्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
ही पदयात्रा २ ऑक्टोबर रोजी सेवाग्राम आश्रमात संपन्न होईल. याच दिवशी महात्मा गांधी जयंती, दसरा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी दिन एकत्र येत आहे. या निमित्ताने युवक काँग्रेसकडून रेशीमबागेतील संघ मुख्यालयात जाऊन देशाचे संविधान भेट देण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.मशाल यात्रा आणि पदयात्रेमुळे संविधान रक्षणाच्या लढ्याला नवे बळ मिळेल, असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला आहे.
‘हम भारत के लोग’ या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने २९ सप्टेंबरपासून दीक्षाभूमी, नागपूर येथून सेवाग्राम, वर्धा पर्यंत संविधान सत्याग्रह पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेला विविध नागरी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला असून, विशेषतः महाविकास आघाडीचे सक्रिय सहकार्य लाभले आहे.
देशातील लोकशाही आणि संविधानिक मूल्यांवर वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि संविधान रक्षणाचा संदेश पोहोचवण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. महात्मा गांधी यांच्या विचारांचा वारसा जपत, त्यांच्या पणतू तुषार गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत पार पडणार आहे.