नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये परीक्षा विभागातील गोंधळ, प्राध्यापक नियुक्तीसाठी गैरप्रकाराचे आरोप, आमदार प्रवीण दटके यांची अधिसभेवर अवैध नियुक्तीचा आरोप, एमकेसील आणि प्रोमार्क कंपनीवरील आरोपांवरून भाजयुमो आणि शिक्षण मंचामध्ये सुरू असलेल्या वादात आता ‘एनएसयूआय’नेही उडी घेतली आहे.

प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नसून खोटे आश्वासन देत असल्याचा आरोप करीत ‘एनएसयूआय’ने सोमवारी कुलगुरूंच्या कक्षासमोर ठिय्या दिला. यावेळी कुलगुरूंविरोधात घोषणा देण्यात आल्या. त्यांच्या खुर्चीवर ‘निष्क्रिय कुलगुरू’ असे लिहिण्यात आले. या आंदोलनामध्ये नागपूर शहर अध्यक्ष प्रणय सिंह ठाकूर, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अजित सिंग, प्रदेश महासचिव आसिफ शेख, आशीष मंडपे, निखिल वानखेडे, निशाद इंदुरकर सहभागी झाले होते.

हेही वाचा >>>नागपुरात पदभरती परीक्षे दरम्यान महिलांचा गोंधळ… कारण काय?

भाजपच्या गटातील वाद काय?

कुलगुरूंकडून व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चर्चेचे लेखी आश्वासन दिल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले. नागपूर विद्यापीठात मागील काही दिवसांपासून कुलगुरू डॉ. सुभाष चौधरींच्या निलंबनावरून भाजप परिवारातील शिक्षण मंच आणि भाजयुमोमध्ये वाद सुरू आहे. शिक्षण मंचाच्या अध्यक्ष डॉ. कल्पना पांडे यांनी आमदार प्रवीण दटके, विष्णू चांगदे, शिवानी दाणी आदींनी विद्यापीठाबाबत खोटी माहिती पसरवल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. यावर विष्णू चांगदे व अन्य सदस्यांनीही प्रत्युत्तर देत चौधरींना वाचवण्याचा पांडे यांचा शेवटचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. शिक्षण मंचाकडून आमदार प्रवीण दटके, प्रभारी कुलगुरू डॉ. बोकारे यांच्यावर आरोप झाले. तसेच प्रोमार्क कंपनीला काम देण्यावरूनही टीका झाली. प्राध्यापक भरतीमध्ये भ्रष्टाचार करण्यासाठीच दोन्ही गटात वाद सुरू असल्याची चर्चाही विद्यापीठ वर्तुळात सुरू आहे.

हेही वाचा >>>असे असावे टुमदार घरकुल, उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात…

पदभरती आणि आर्थिक गणितावरून वाद

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ९२ पदाची भरती रद्द झाल्यानंतर आता पुन्हा या मुद्यावरून विद्यापीठात महाभारत सुरू झाले आहे. एकीकडे शिक्षण मंचकडून त्यामध्ये भाजपकडून आर्थिक गणित ठरल्याचा आरोप करण्यात येत असून दुसरीकडे आता भाजपच्या एका गटाने त्याची चौकशी करण्याचीच मागणी केली आहे. त्यामुळे येत्या काळात पदभरती मध्ये होत असलेल्या आर्थिक राजकारणामुळे वातावरण चांगलेच ढवळून निघणार आहे.

आंदोलन कशासाठी?

– विद्यापीठात भ्रष्टाचार वाढला असून विद्यार्थ्यांना प्रचंड समस्या जाणवत आहेत.

– प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे दिलेला शब्द पाळत नसल्याचा आरोप.

– प्रोमार्क आणि एमकेसीएल कंपनीमध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– प्राध्यापक नियुक्तीवरून विद्यापीठात झालेल्या गैरप्रकाराच्या चौकशीची मागणी.