नागपूर : राज्यात गुन्हेगारांना शासनाकडून संरक्षण दिले जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या भावाला राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सहीने शस्त्र परवाना दिल्याचे समोर आल्यानंतर, सरकारवर जोरदार टीका करत वडेट्टीवार म्हणाले, “महायुती सरकारने आता ‘लाडका गुंड’ योजना आणावी.”

सकल ओबीसी महामोर्चातर्फे उद्या, मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या मोर्चाच्या तयारीची पाहणी वडेट्टीवार यांनी यशवंत स्टेडियम येथे आज केली. यावेळी ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, “राज्यात ज्या गुंडांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्यांना पासपोर्ट मिळतात, शस्त्र परवाने दिले जातात आणि ते देशाबाहेर जातात. हे सगळं कोणाच्या आशीर्वादाने घडतंय? गुंडांना प्रोत्साहन देणं ही सरकारची नविन धोरणं वाटत आहे. त्यामुळे आता सरळसरळ ‘लाडका गुंड’ योजना जाहीर करावी आणि अशा गुंडांसाठी शस्त्र परवान्यांचे खास काउंटर सुरू करावेत.”

वडेट्टीवार यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीका करताना पुढे म्हटले, “शस्त्र परवाने वाटपाची जबाबदारी योगेश कदम यांच्याकडे द्यावी, म्हणजे हे गुंड निवडणुकीतही उपयोगी पडतील.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वडेट्टीवार यांनी सरकारवर आणखी एक आरोप करत म्हणाले की, “२ सप्टेंबर रोजी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे ओबीसी समाजात तीव्र नाराजी आहे. या अस्वस्थतेत अकोल्यातील आलेगावमध्ये विजय बोचरे या तरुणाने आत्महत्या केली. त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने पत्र लिहून आपली व्यथा मांडली होती. ही आत्महत्या म्हणजे सरकारच्या चुकीच्या धोरणांचे परिणाम आहेत.”

“ओबीसी समाजातील ३७४ जाती नामशेष व्हाव्यात, असा प्रयत्न सरकार करत आहे. हे सरकार या समाजाला गुलाम बनवण्याचे काम करत आहे,” असा आरोप करत वडेट्टीवार म्हणाले की, “सरकार झोपेत आहे आणि ओबीसी समाजाचे आयुष्य धोक्यात आहे.”

नागपुरात ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चाच्या तयारीबाबतही त्यांनी माहिती दिली. “ओबीसी समाजातील कोणत्याही व्यक्तीने टोकाचे पाऊल उचलू नये. हा लढा रस्त्यावरून लढायचा आहे, जीवन संपवून नव्हे,” असे आवाहन करत वडेट्टीवार यांनी समाजाला एकजूट राहण्याचे आवाहन केले.

वडेट्टीवार यांच्या या टीकेमुळे राज्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. गुन्हेगारीवरून सरकारची कोंडी करण्यात काँग्रेस यशस्वी ठरेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.