नागपूर : महाविकास आघाडीने रामटेक लोकसभेची जागा काँग्रेससाठी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेस येथून कोणाला उमेदवारी देणार याकडे लक्ष लागले होते. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसकडून माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी यांची प्रमुख दावेदारी होती. पक्षश्रेष्ठींनी रश्मी बर्वे यांना पसंती दिल्याचे समजते. अधिकृत घोषणा आज रात्री होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नागपूर जिल्ह्यातील नागपूर आणि रामटेक या दोन्ही जागा काँग्रेसकडे आल्या आहेत. नागपूरमधून आमदार विकास ठाकरे यांना संधी मिळावी, यासाठी येथील स्थानिक नेत्यांनी प्रस्ताव आधीच दिल्लीकडे पाठवला आहे. त्याबाबत पक्षाने अद्याप अधिकृत घोषणा केली नाही. तर रामटेकमधून रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली जावी, यासाठी जिल्ह्यातील माजी मंत्री आग्रही होते. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे माहिती आहे.

हेही वाचा…बुलढाणा: महायुतीच्या उमेदवारीची घोषणा आज; आघाडीची होळीनंतर? ठाकरे गट-काँग्रेसमध्ये धुळवड रंगल्याने विलंब!

रामटेक हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. काँग्रेसने १९५७ ते १९९८ पर्यंत येथून खासदार पाठवला होता. अनुसूचित जातीसाठी मतदारसंघ राखीव झाल्यानंतर २००९ मध्ये परत काँग्रेसने ही जागा जिंकली. परंतु २०१४ पासून ही जागा शिवसेनेकडे आहे. रामटेकचा गड परत मिळवण्यासाठी जिल्ह्यातील एका माजी मंत्र्यांनी रश्मी बर्वे यांच्या बाजूने ताकद उभी केली आहे. तसेच पक्षश्रेष्ठींचे मत वळण्यात यशस्वी झाल्याचे समजते.