नागपूर: लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात काँग्रेस आणि मित्र पक्षांना सर्वाधिक जागा मिळाल्या. यामध्ये भाजपला कमी जागा मिळाल्याने काँग्रेसचा आत्मविश्वास बळावला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा कमबॅक करत काँग्रेसला धोबीपछाड केला. भंडारा-गोंदिया विधानसभेतून काँग्रेसचे खासदार निवडून आला होता. मात्र वर्षभरातच या खासदाराला प्रभावाचा धक्का सहन करावा लागला आहे. भंडारा जिल्हा सहकारी बँकेत काँग्रेस आमदार नाना पटोले यांच्या पॅनेलचा पराभव झाला आहे.
याशिवाय भंडारा-गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. हाती आलेल्या निकालानुसार, भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पुरस्कृत सहकार पॅनेलचे एकूण ११ उमेदवार निवडून आले आहेत. तर न्यायालयाची स्थगिती असल्याने ६ संचालकांची मतमोजणी अद्याप प्रलंबित आहे. असे असले तरी २१ पैकी ११ संचालक निवडून आल्याने ही बँक पुन्हा सहकार पॅनेलच्याच ताब्यात राहणार आहे.
भंडारा बँकेचे माजी अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या विरोधात काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांनी उमेदवारी दाखल केली होती. त्यामुळे निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. खासदार स्वतःच बँकेच्या निवडणुकीत उतरल्याने सर्वांचे लक्ष या लढतीत लागले होते. मात्र फुंडे यांनी खासदारांना पराभवाचा धक्का दिला.ही निवडणूक नाना पटोले यांनी प्रतिष्ठेची केली होती. सुरुवातीला त्यांनी आपण बँकेची निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी उमेदवारी दाखल केली होती. पण गोंदिया जिल्हा बँक आणि भंडारा दूध संघात त्यांच्या पॅनेलच्या झालेल्या पराभवाचा धसका बहुदा त्यांनी घेतला आणि ऐनवेळी उमेदवारी मागे घेतली.
दूध संघाच्या निवडणुकीत भंडाऱ्याचे शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पटोले यांच्यासोबत हातमिळवणी केली होती. यावरून महायुतीमध्ये मोठे मतभेद उफाळून आले होते. भंडारा बँकेच्या निवडणुकीत भोंडेकर यांनी आपली चूक सुधारली. ते पुन्हा महायुतीत परतले. त्यामुळे महायुतीच्या पॅनेलच्या उमेदवारांची ताकद आणखी वाढली होती. याशिवाय मत विभाजनाचाही धोका टळला होता. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ४१ उमेदवारांनी दाखल केली होती. रविवारी संचालकपदासाठी मतदान घेण्यात आले होते. १०६२ मतदारांनी १०० टक्के मतदानाचा हक्क बजावला होता. भंडारा बँकेची निवडणूक महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल पटेल, भाजपचे आमदार परिणय फुके, शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात लढवली होती.