नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबई मार्गे मँचेस्टर, ॲमस्टरडमसाठी कनेक्टिंग विमानसेवा १ जुलैपासून सुरू होत आहे. सध्या नागपूर येथून दोहा व शारजहाकरिता थेट विमानसेवा आहे.
नागपूर – मुंबई (६ई ८०६) हे विमान रात्री १०.३५ नागपूर येथून निघेल आणि मुंबईला रात्री १२.१० वाजता पोहोचेल. मुंबई -मँचेस्टर (६ई३१) हे विमान पहाटे सव्वा चार वाजता मुंबईहून निघेल आणि सकाळी सव्वा नऊ वाजता पोहोचेल. हे उड्डाण आठवड्यातून तीन दिवस आहे.मँचेस्टर-मुंबई (६ई३२) हे विमान दुपारी १२ वाजता मँचेस्टर येथून निघेल आणि मुंबईला रात्री १.३५ ला पोहोचेल. तर मुंबई-नागपूर (६ई६०५८) हे विमान सकाळी ६.१० वाजता मुंबईहून निघेल आणि नागपूरला सकाळी पावणेआठ वाजता येईल.
नागपूर-मुंबई (६ई८०६) हे विमान नागपूर येथून रात्री १०.३५ वाजता निघेल आणि रात्री १२.१० वाजता पोहोचेल. मुंबई-ॲमस्टरडम (६ई२१) हे विमान पहाटे ५.२० वाजता मुंबईहून निघेल आणि ॲमस्टरडमला दुपारी ११ वाजता पोहोचेल.ॲमस्टरडम-मुंबई (६ई२२) हे विमान दुपारी २ वाजता ॲमस्टरडमहून निघेल आणि मुंबईला रात्री १.२२ वाजता पोहोचेल. तेथून मुंबई-नागपूर (६ई६०५८) हे विमान सकाळी ६.१० वाजता निघेल आणि नागपूरला सकाळी पावणे आठ वाजता पोहोचले. हे उड्डाण आठवड्यातून तीन दिवस आहे.
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचे ‘रि-कॉर्पेटिंग’ काम पूर्ण झाले असून नागपूर विमानतळावरून आता चोवीस तास विमानांचे संचालन सुरू झाले. नागपूर विमानतळावर धावपट्टीचे रिकार्पेटिंगचे काम सुमारे एक वर्षापासून सुरू होते. अखेर ते ३१ मार्च २०२५ रोजी पूर्ण झाले आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून नागपूर विमानतळावर सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत विमानसेवा बंद करण्यात आली होती. ती आता पूर्ववत करण्यात आली आहे. तसेच या विमानतळावरून नवीन विमानांची सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उन्हाळ्याच्या वेळापत्रकामध्ये इंडिगो एअरलाईन्स आणि स्टार एअरकडून तीन शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करण्यात येत आहे. तसेच काही शहरांसाठी नागपूर येथून अतिरिक्त उड्डाणे सुरू करण्यात येणार आहेत.