नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रत्येक जोडप्याने तीन मुले जन्माला घालावीत हे वक्तव्य चांगलेच चर्चेत आले होते. त्यांनी प्रत्येक जोडप्याला ३ अपत्य जन्माला घालण्याच सल्ला दिला होता. शिवाय त्यांनी घटत चाललेल्या लोकसंख्येवर चिंता ही व्यक्त केली होती. लोकसंख्या वाढीचा दर २.१ पेक्षा कमी व्हायला नको असे लोकसंख्येचे शास्त्र सांगते असे ते म्हणाले होते. त्यामुळे दोन पेक्षा जास्त म्हणजे कमीत कमी तीन अपत्य असावेत, असे स्पष्ट मत सरसंघचालकांनी नागपुरातील एका कार्यक्रमात नुकतेच व्यक्त केले होते.

त्यानंतर आता  ४ आणि ५ जानेवारीला मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर येथे कौटुंबिक प्रबोधनावर अखिल भारतीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीत देशाच्या ४६ प्रांतातील कुटंब प्रबोधन उपक्रमाचे प्रांतीय समन्वयक व सहसंयोजक पत्नीसह ओंकारेश्वर येथे एकत्र येणार आहेत. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत या बैठकीला पूर्णवेळ उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे यावेळी सरसंघचालक कुठला सल्ला देतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

हेही वाचा >>>महाराष्ट्राच्या सीमेवरील या शहरात सर्वाधिक थंडी…पारा तब्बल…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे संघाचा कौटुंबिक प्रबोधन उपक्रम

कौटुंबिक प्रबोधन उपक्रमाचे अखिल भारतीय समन्वयक डॉ. रवींद्र शंकर जोशी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. कौटुंबिक प्रबोधन उपक्रम २००८ मध्ये सुरू झाला. पहिली अखिल भारतीय बैठक २०१८ मध्ये मुंबईत झाली. दुसरी बैठक २०२२ मध्ये काशी येथे झाली. तिसरी बैठक ४ व ५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत देशातील विविध प्रांतातील प्रांत समन्वयक आणि सहसंयोजक आपल्या कुटुंबासह ओंकारेश्वर येथे एकत्र येणार आहेत. कौटुंबिक प्रबोधन हा उपक्रम २००८ पासून सुरू झाला असला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात पाच वर्षांपूर्वी कुटुंब प्रबोधन या विषयावर काम करण्यास खरी सुरुवात झाली. त्यानंतर घरोघरी संपर्क साधून संवाद साधण्यास प्रारंभ झाला. अयोध्येतील राम मंदिरासाठी जानेवारी २०२१ मध्ये सुरू झालेल्या निधी संकलन अभियानाच्या माध्यमातून संघ स्वयंसेवकांनी परिचयाबाहेरील कुटुंबांशी संपर्क प्रस्थापित केला. यासोबतच २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत झालेल्या श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अक्षता (निमंत्रण) वाटपासाठी देशातील बहुतांशी घराघरांशी संघाचा पुन्हा संपर्क आला. यामध्ये अनेक नवी कुटुंबे संघाशी जोडली गेली. आगामी काळात कुटुंब संघाच्या कार्यासोबत जोडणे, त्यांचे प्रबोधन करणे हा उद्देश ठेवून राष्ट्रीय स्तरावरील बैठकीचे आयोजन केले जात आहे. विशेष म्हणजे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची या बैठकीला पूर्णवेळ उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या बैठकीला अधिक महत्त्व प्राप्त होणार आहे.