घरफोडीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या एका तरुणीवर पोलीस कर्मचाऱ्यानेच बलात्‍कार केल्‍याची घटना बुधवारी गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी आरोपी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलेश जगताप (३८), असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पीडित २० वर्षीय तरुणीवर शहरातील एका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात नीलेश हा तिची चौकशी करीत होता. त्याने पीडित तरुणीला मदत करतो, असे म्हणून तिचा विश्वास संपादन केला.

हेही वाचा >>> बुलढाणा : ‘अपनी राणी किसी और की हो गयी, सॉरी मित्रांनो…’ असे ‘स्टेटस’ ठेऊन तरूणाने…

चौकशीदरम्यान तिला स्वत:चा मोबाइल क्रमांक देऊन जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने पीडित तरुणीला व्हॉट्सॲपवर संदेश पाठवणे सुरू केले. आपण भेटून बोलू, असे तो म्हणत होता. २ नोव्हेंबर २०२२ रोजी सदर प्रकरणाबाबत बोलायचे आहे, असे सांगून नीलेशने पीडित तरुणीला छत्री तलाव येथे बोलाविले. तेथे चर्चा झाल्यानंतर त्याने पुन्हा १० मार्च रोजी आपण चिखलदरा येथे जावून बोलू, असे पीडित तरुणीला म्हटले. त्यानंतर १३ मार्च रोजी नीलेशने पीडित तरुणीला संदेश पाठवला. दुसऱ्या दिवशी १४ मार्च रोजी नीलेशने पीडित तरुणीला व्हीएमव्ही परिसरात बोलावले. दुचाकीवर मागे बसून नीलेश हा तिला चांदूरबाजार मार्गावर घेऊन गेला. त्याने अचानक तिला दुचाकी थांबवायला सांगितली.

हेही वाचा >>> नागपूर : प्रेमाच्या त्रिकोणातून प्रियकराने युवकाला भोसकले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपण शेतात जावून बोलू, असे तो पीडित तरुणीला म्हणाला. त्यानंतर नीलेशने पीडित तरुणीला एका शेतात नेऊन पीडित तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणीने विरोध केल्यावर त्याने तिला गुन्ह्यात फसविण्याची धमकी दिली. त्यानंतर नीलेशने पीडित तरुणीवर बलात्‍कार केला. या घटनेनंतर पीडित तरुणीने गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी नीलेश जगतापविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.