चंद्रशेखर बोबडे

नागपूर : करोनाच्या पहिल्या दोन लाटांमध्ये दगावलेल्यांची संख्या राज्यात लाखोने असून एक वर्ष झाले तरी अद्यापही अनेक मृतांच्या वारसांची नावे अर्ज करूनही घर, शेतीच्या मालकी पत्रावर न चढल्याने त्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. करोनामुळे राज्यात आतापर्यंत  एकूण १ लाख ४७८५७ मृत्यू झाले. नागपूर जिल्ह्याचा विचार करता २४ मेपर्यंत १०,३३८ मृत्यूची नोंद आहे. यात बहुतांश, कुटुंब प्रमुख,ज्येष्ठ नागरिक  व तरुणांचा समावेश आहे. यापैकी अनेक कुटुंबांनी रुग्णाच्या उपचारावर लाखो रुपये खर्च केले, काहींनी त्यासाठी कर्ज घेऊन  रुग्णालयांची देयके चुकती केली. पण, तरीही रुग्ण वाचू शकला नाही. एकीकडे कर्ता पुरुष गेला व दुसरीकडे त्याच्या उपचाराच्या खर्चामुळे कुटुंबीयांवर कर्जाचा बोझा वाढला. तो फेडण्यासाठी व कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेकांना पुन्हा कर्ज घेण्याशिवाय पर्याय नाही, परंतु भूमिअभिलेखच्या नगरभूमान कार्यालयाकडे अर्ज करूनही एक ते दोन वर्ष झाले. पण  फेरफारची प्रकरणे प्रलंबित आहेत. नगरभूमान विभागाकडे सध्या प्रलंबित फेरफार अर्जाची संख्या विदर्भात ४० हजारांवर असल्याचे  विभागातील सूत्रांनी सांगितले. घर किंवा शेती नावावर नसल्याने बँका कर्ज देत नाही, ते तारणही ठेवता येत नाही, त्यामुळे कुटुंबीयांची अडचण झाली आहे. नागपुरातील राहुल दीक्षित यांचे वडील करोनाच्या दुसऱ्या लाटेत दगावले. त्यांनी ७ जुलै २०२१ ला त्यांच्या वडिलांच्या नावावरील घर मुलांच्या नावे करण्यासाठी अर्ज केला होता. पिपळा रोड मार्गावरील उमेश कडू यांचाही मृत्यू मे २०२१ मध्ये करोनामुळे झाला. त्यांच्या पत्नीने जून २०२१ मध्ये नगरभूमापन मध्ये फेरफारसाठी अर्ज केला होता. एक वर्ष होत आले तरी अद्याप त्यांचे फेरफार झाले नाही. दोन्ही व्यक्ती कुटुंब प्रमुख होत्या व उपचारामुळे कुटुंबीय कर्जबाजारी झाले आहेत, अशी अनेक उदाहरणे प्रत्येक जिल्ह्यात आहेत. नगरभूमापन विभागाकडे विचारणा केली असता संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन झाल्याने तांत्रिक अडचणी येत असल्याचे व त्यामुळे विलंब होत असल्याचे सांगण्यात आले.

राज्य शासनाकडून करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना ५० हजारांची मदत केली जात आहे. यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवली जात आहे, याच धर्तीवर करोना मृतांच्या वारसांची  फेरफार प्रकरणे निकाली काढण्यासाठी यंत्रणा राबवली तर त्यांना दिलासा मिळू शकतो, अशी सूचना विदर्भ भूमिअभिलेख कर्मचारी संघटनेचे सचिव श्रीराम खिरेकर यांनी केली आहे.

नागपुरातील नगरभूमापन विभागाचे कार्यालय जुन्या प्रशासकीय इमारतीच्या चौथ्या माळय़ावर आहे. तेथे ज्येष्ठ नागरिकांना जाताना अडचणी येतात. शिवाय येथे नागरी सुविधा केंद्रही नाही, मनुष्यबळाचीही अडचण आहे.

करोना मृत्यू

  • राज्य- १ लाख ४७८५७
  • नागपूर जिल्हा- १०,३३८

करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांचे फेरफार न झाल्याने येणाऱ्या अडचणी लक्षात घेता त्यांचे अर्ज निकाली काढण्यासाठी विशेष शिबीर आयोजित करण्याचा विचार केला जाईल.

– आनंद रायते, अतिरिक्त आयुक्त, जमाबंदी व संचालक भूमिअभिलेख विभाग