यवतमाळ : संघटीत टोळीयुद्ध आणि संघटित गुन्हेगारीसाठी यवतमाळ व पुसद शहर प्रसिद्ध आहे. आता या शहरांसह जिल्ह्यात गावगुंडांच्या हातात देशी बनावटीचे पिस्टल आल्या आहेत. खून, प्राणघातक हल्ले, खंडणी वसुली, दहशत निर्माण करण्यासाठी देशी पिस्टलचा वापर वाढत आहे. जिल्ह्यात पिस्टल सहज उपलब्ध होत असल्याने हा चिंतेचा विषय ठरला आहे.
स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस पथकांनी मागील ११ महिन्यांत तब्बल १६ देशी बनावटीचे पिस्टल जप्त केले. सर्वाधिक कारवाया पुसद व यवतमाळ उपविभागात करण्यात आल्या. त्यामुळे किती मोठ्या प्रमाणात पिस्टलचा वापर गुन्हेगारी वर्तुळासह नवख्या गावगुंडाकडून केला जात आहे, हे सहज लक्षात येते. अल्पवयीन मुलेही पिस्टल खिशात टाकून फिरत असल्याचे दिसते. देशी पिस्टलच्या धाकावर गावगुंड परिसरात आपली दहशत निर्माण करत आहे. याची माहिती स्थानिकांना असताना घातपात होण्याच्या भीतीने पोलिसांना माहिती देण्याचे धाडस कोणी करत नाही.
अमरावती जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या भागात देशी बनावटीचे पिस्टल बनविले जाते. काहींनी लहान कारखानेच थाटले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पिस्टल तस्करीचे कनेक्शन थेट मध्यप्रदेशात आहे. मात्र, तेथे पथक गेल्यास स्थानिक पोलिसांचे सहकार्य मिळत नाही. काही वर्षांपूर्वी केवळ ‘भाई’ पिस्टल वापरायचे. आता ‘क्रेझ’म्हणून तरुणही देशीकट्ट्याचा वापर करताना दिसतात. वाळू तस्करीत असणाऱ्या माफियांच्या हातात पिस्टल आले आहे. त्याच्याच धाकावर अधिकाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार घडत आहे. या वर्षात यवतमाळ शहर, बाभूळगाव, नेर, पुसद, घाटंजी या शहरात देशी बनावटीच्या पिस्टल जप्तीच्या १६ कारवाया करण्यात आल्या. त्यात नऊ कारवाया स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केल्या आहेत. सात कारवाया या पोलिसांच्या पथकाने केल्या. खबऱ्यांचे नेटवर्क वाढविल्यास पोलिसांच्या कारवाईत पिस्टल बाळगणारे शेकडो गावगुंड अडकू शकतात, ही वस्तुस्थिती आहे.
पोलीस आरोपीला अटक करून पिस्टल जप्त करतात. मात्र पिस्टल कुणाकडून खरेदी केले. कुणाचा घातपात करण्याचा उद्देश होता. विक्रेत्याचे नाव समोर येणे आवश्यक असताना हा तपास पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे. तपास आरोपीच्या अटकेवरच थांबत असल्याने गावगुंडावर जरब बसत नाही.
हेही वाचा – नागपूर : ९७ वर्षीय वडिलांसह पाच मुलांनी घेतले मेडिकलमधून शिक्षण
२०२२ मध्ये पिस्टल जप्तीचे पाच गुन्हे दाखल आहेत. त्यात तीन कारवाया स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केल्या. २०२३ मध्ये जिल्ह्यात देशीकट्टे जप्तीच्या १६ कारवाया करण्यात आल्या. यातील नऊ कारवाया स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केल्या आहेत. यवतमाळ आणि पुसद शहरातून प्रत्येकी सात देशी कट्टे जप्त करण्यात आले. त्यामुळे दोन्ही शहरांत पिस्टलप्रेमी अधिक असल्याचे दिसते.