चंद्रपूर : पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडून अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या प्रकाराने हॅकरने चक्क पोलिसांनाच आव्हान दिले आहे.
समाजमाध्यमावरील फेसबुकवर सर्वसामान्यांपासून लोकप्रतिनिधी, सिने अभिनेता, अभिनेत्री, अधिकारी यांचे अकाउंट आहेत. या सोशल माध्यमाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. फेसबुकवर नाव, फोटो टाकून बनावट फेसबुक अकाउंट बनवून मैत्रीच्या जाळ्यात ओढून फसवणूक करण्यात येत असल्याचा प्रकार अनेकदा समोर आला आहे. मात्र, आता हॅकरने चक्क चंद्रपूर पोलीस अधीक्षक रविंद्र सिंह परदेशी यांचे फेसबुक अकाउंट हॅक केले आहे.
हेही वाचा – गृहमंत्र्यांच्या शहरात ऑटोरिक्षा चालकांमध्ये नियम मोडण्याची स्पर्धा
रवींद्रसिंह परदेशी असे नाव टाकून चक्क त्यांचा फोटोही टाकला आहे. एवढेच नाही तर तो इतरांना रिक्वेस्टही पाठवत असून, तो त्यांच्याशी चॅट करण्याचा प्रयत्नही करीत आहे. ही बाब पोलीस अधीक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका, ब्लॉक करून फेसबुकला रिपोर्ट करा, असे आवाहन केले. मात्र या प्रकाराने हॅकरने पोलिसांनाच आव्हान दिले आहे. त्यामुळे हा हॅकर पकडला जातो की काय, असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे. अधिकाऱ्यांची बदली झाली आहे, त्यांचे महागडे फर्निचर विकायचे आहे असे मेसेज समाजमाध्यमावर टाकून लोकांकडून पैसे उकळले जात आहेत.