गोंदिया: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील नागपूर ते रायपूर मार्गावर भरधाव ट्रकने एक सायकल स्वाराला चिरडल्याची घटना आज शनिवार १७ मे २०२५ रोजी घडली. या घटनेत ट्रकच्या चाकाखाली आल्याने सदर सायकलस्वाराचा चेंदामेंदा झाला. मृतक इसमाचे नाव सहादेव सेगुजी पाऊलझगडे (वय ६०) रा. चिखली ता. सडक अर्जुनी असे आहे.

डुग्गीपार पोलिसांनी माहितीनुसार, मृतक व्यक्ती हा सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती असून, तो आज शनिवारी सकाळी सडक अर्जुनीकडे सायकलने कामावर जात असताना, कोहमारा येथील नवेगाव बांध चौकात अंदाजे १०:३० वाजताच्या सुमारास नागपूर कडून रायपूरकडे जात असलेला ट्रक क्र. एन. एल. ०१ ए.ई ७१३४ च्या ट्रकचालकाने धडक दिली. यावेळी तो ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. सदर घटनेची माहिती मिळताच, डुग्गीपार पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी येथे पाठविला. दरम्यान ट्रक चालकाला ट्रक सह ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास डुग्गीपार पोलीस करीत आहे. मृतकाच्या पश्चात पत्नी, दोन मुले, नातवंड असा बराच आप्तपरिवार असून, चिखली या गावात घटनेची माहिती होताच हळहळ व्यक्त केली जात आहे.

खमारीच्या फुटका तलावात गुरांना धुण्यासाठी गेलेल्या मुलगा बुडाला

गोंदिया तालुक्यातील हलबीटोला/खमारी गावात, विश्व योगराज प्रधान (१५) हा शुक्रवारी सायंकाळी ३ वाजता गुरांना धुण्यासाठी तलावात उतरला आणि गुरांना आंघोळ घालू लागला. दरम्यान, तलावाच्या आत जमीन असमतोल असल्याने तो खड्ड्यात पडला आणि पाण्यात बुडू लागला. दरम्यान, बुडणाऱ्या मुलाने ओरडायला सुरुवात केली. इतक्यात तो तलावात खोलवर गेला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनेची माहिती मिळताच, तलावाच्या काठावर मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले. माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी आले. शोध कार्य सुरू करण्यात आले. परंतु शुक्रवारी अंधार होत पर्यंत आणि आज शनिवारी दुपारी २ वाजतापर्यंत ही शोध लागला नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी दुपारी रस्ता रोको केला.