• मतदार वळविण्यासाठी नागपूरच्या उमेदवाराचा प्रताप
  • विधान परिषद निवडणूक

विधान परिषदेच्या भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात १९ नोव्हेंबरला होत असलेल्या निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी सर्व उमेदवार साम, दाम, दंड, भेद या चतुसूत्रीचा वापर करीत आहेत. नागपुरातील एका उमेदवाराच्या मदतीसाठी कुख्यात गुंडांनी भंडारा-गोंदिया येथे तळ ठोकला असल्याची माहिती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यभरात सहा विधान परिषद सदस्यांची निवड करण्यात येत आहे. पूर्व विदर्भातील भंडारा आणि गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणूक होत आहे. यासाठी भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय परिणय फुके, काँग्रेसचे गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांचे पुत्र प्रफुल्ल अग्रवाल आणि राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांचे कार्यकर्ते राजेंद्र जैन रिंगणात उभे आहेत.

विधान परिषद निवडणूक म्हटली की, सर्व पैशांचा खेळ. नगर पालिका, नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे सदस्य हे मतदार असतात. त्यामुळे एकेका मताला प्रचंड महत्त्व असते. या मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी एका मताची अधिकाधिक बोली लावण्यात येते. यात सर्वाधिक बोली लावणारी व्यक्ती यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते.

भंडारा-गोंदिया विधान परिषद मतदारसंघावर कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि कॉंग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांना आर्थिकदृष्टया तुल्यबळ ठरावा असा उमेदवार देण्यासाठी भाजपकडून प्रयत्न होत असून गेल्या काही वर्षांपासून तेथे नागपुरातून उमेदवार पाठविण्यात येतो. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी-कॉंग्रेसची आघाडी होती. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. परंतु यंदा कॉंग्रेस, राष्ट्रवादी वेगवेगळे लढत असल्याने भाजपच्या उमेदवाराला विजयाची संधी आहे. परिणय फुके यांच्या पाठीशी मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत.

त्यामुळे पक्षाचे मतदार त्यांच्यासोबत राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, निवडणूक शेवटी पैशावर अवलंबून असून पैसा देऊनही विश्वासघात होऊ नये म्हणून गुन्हेगारी जगतातील संबंधाचाही वापर करण्यात येत आहे.

नागपूरचा ‘डॉन’ अशी ओळख असलेला संतोष आंबेकर हा आपल्या पन्नासवर साथीदारांसह भंडारा-गोंदिया जिल्ह्य़ात तळ ठोकून आहे. प्रत्येक मतदारावर आंबेकर आणि त्याचे साथीदार लक्ष ठेवून असल्याची माहिती असून नागपुरातून पाठविण्यात आलेल्या उमेदवारासाठी ते प्रयत्न करीत असल्याची माहिती आहे. यापूर्वी आंबेकरचे अनेक राजकीय पुढाऱ्यांशी संबंध असल्याचे अनेक घटनातून उघड झाले आहे. आता भंडारा-गोंदियात आंबेकरचे कार्ड किती यशस्वी ठरते, याकडे सर्वाचे लक्ष लागले असून या निवडणुकीत यश कुणाला मिळते, हे काही दिवसांतच स्पष्ट होईल. मात्र, गुंडांशिवाय निवडणुकीची कल्पना करू शकत नाही, हे पुन्हा स्पष्ट झाले.

 

 

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Criminals in bhandara gondiya local bodies election
First published on: 09-11-2016 at 03:08 IST