प्रशांत देशमुख, लोकसत्ता

वर्धा : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीकेचा घणाघात करीत प्रदेश तैलिक संघटनेने खासदार रामदास तडस हेच समाजाचे नेते असल्याचे ठरावातून स्पष्ट केले आहे.

खासदार रामदास तडस यांचा गड समजल्या जाणाऱ्या देवळीत प्रांतिक तैलिक समाज संघटनेच्या प्रदेश कार्यकारीणीची बैठक झाली. त्यात राज्यभरातील समाजाच्या सर्व जिल्हा संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव तसेच प्रदेश पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे समाजातील अन्य राजकीय नेत्यांचे खच्चीकरन करीत असून समाजाला त्यांचा फायदा काय, असा थेट सवाल झाला. चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव न घेता टीकेचे आसूड ओढण्यात आले.

आणखी वाचा-महिला उपजिल्हाधिकाऱ्याने शासनाचे कोट्यवधी रुपये हडपले, गंभीर गुन्हे दाखल

चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर विदर्भात भाजपचे एकही जिल्हाध्यक्षपद समाजाला मिळाले नाही, या जुन्या आरोपाची पुनरावृत्ती झाली. पदावर आल्यानंतर समाजाच्याच नेत्यांना टाळल्या जावू लागले. गावात आल्यावर समाजाच्या नेत्याने बोलावल्यास वेळ दिल्या जात नाही. जेव्हा ‘त्यांच्या’ कडे पक्षाने दुर्लक्ष केले होते, तेव्हा त्यांना समाज आठवला. नंतर परत विसरले. उलट खा.तडस हे समाज संघटनेसाठी झोकून देणारे नेते आहे. अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी मोठे केले. त्यांना लहान करण्याचा प्रयत्न करीत नंदूरबारच्या एका कुंटुंबास मोठे करण्याचा प्रयत्न होत आहे. हे खपवून घेतल्या जाणार नाही. खा.तडस हेच समाजाचे सर्वमान्य नेते असून त्यांनाच निवडणूकीत प्रतिनिधीत्व मिळावे, अशी अपेक्षा आहे. त्यांना डावलल्यास निवडणूकीत गंभीर परिणाम दिसून येतील असा सणसनीत इशारा प्रदेश नेत्यांनी दिला.

एक दिवसापूर्वी झालेल्या समाजाच्या प्रदेश महिला आघाडीच्या सभेत खा.तडस हेच समाजाचे नेते असल्याचा व त्यांनाच निवडणूकीत प्रतिनिधीत्व देण्याचा अधिकृत ठराव करण्यात आला. खा.तडस यांचे भाजपचे लोकसभा निवडणूकीचे तिकिट कापण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर हा ठराव चर्चेत आला. युवा शाखेचे नेते विपीन पिसे यांनी असा ठराव झाल्याबद्दल दुजोरा दिला. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष असलेले खा.तडस यांनी समाज संघटनेच्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांच्या भूमीकेचा निषेध केला. ते रोज एक नवी मागणी घेवून जनतेला वेठीस धरत आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली टिका पातळीसोडून असल्याने त्यांचा निषेध करीत असल्याचे तडस म्हणाले. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करण्यात आला.

आणखी वाचा-नागपुरातील रामझुल्यावर भीषण अपघात, महिला कारचालकाने दोन युवकांना चिरडले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संघटनेच्या या बैठकीत महिला प्रदेशाध्यक्ष पुष्पा बोरसे, विद्या करपे, नैना झाडे, सिमा चौधरी, माधूरी तलमले, सुशिला गुप्ता, सांगलीचे सुभाष पन्हाळे, पुणे येथील रावसाहेब राऊत, नांदेडचे ॲड.शशिकांत व्यवहारे, अमरावतीचे संजय हिंगासपूरे, रत्नागिरीचे संदीप मुंडेकर व दीपक राऊत, चाळीसगावचे सुरेश चौधरी व पवार गुरूजी, नाशिकचे भूषण कर्डिले, नागपूरचे बळवंत मुरगुडे, मुंबईचे सुनील चौधरी, बारामतीचे पोपटराव गवळी, गजूनाना शेलार, प्रमोद पिपरे, प्रकाश देवतळे, जगदीश वैद्य व अन्य नेत्यांनी खा.तडस यांची पाठराखन केली.