नागपूर : सायबर गुन्हेगारांनी फसवणूक करण्यासाठी नवनवीन प्रकारचे जाळे टाकणे सुरु केले असून आता लहान-सहान रक्कम लुटण्यात येत आहे. कमी रक्कम असल्यामुळे राज्यात हजारो तक्रारींची गुन्हे दाखल करण्यासाठी नोंदच घेण्यात येत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारांनी आतापर्यंत कोट्यवधी रुपये घशात घातले आहे. राज्यात दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारी वाढत असून सायबर गुन्हेगारांच्या टोळ्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे.
जामतारा-झारखंड, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि उत्तराखंड राज्यातून सर्वाधिक सायबर गुन्हेगार सक्रीय आहेत. सुरुवातीला एटीएम कार्ड-डेबीट कार्डचा पासवर्ड विचारून फसवणूक होत होती. तसेच बँकेतून बोलत असल्याचे सांगून किंवा विमानतळावर महागडी भेटवस्तू आल्याचे सांगून सायबर गुन्हेगार फसवणूक करीत होते. आता शेअर ट्रेडिंग आणि टास्क फ्रॉड या नवीन प्रकारे सायबर गुन्हेगार कोट्यवधीने फसवणूक करीत असल्याची माहिती ‘सायबर महाराष्ट्र’ संकेतस्थळावरून समोर आली आहे.
हेही वाचा…चंद्रपूर : बाजारात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुखवटे; आचार संहितेचा भंग? खर्च कोणाच्या खात्यात…
बँक, सायबर तज्ञ, पोलिसांनी जनजागृती केल्यामुळे अनेकांना सायबर गुन्हेगारांच्या फसवणुकीच्या जाळ्याची माहिती झाली होती. तसेच तक्रारींमध्ये मोठी रक्कम असल्यास पोलीस तपास करून सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहचत होते. ५ ते २० हजार रुपयांपर्यंतच्या फसवणुकीच्या तक्रारींची सायबर पोलीस गांभीर्याने दखल घेत नाहीत. तसेच फसवणुकीची कमी रक्कम असल्यामुळे पोलीस सायबर गुन्हेगारांचा छडाही लावत नाहीत. हीच बाब हेरून त्यामुळे सायबर गुन्हेगारांच्या टोळ्यांनी कमी रक्कमने फसवणूक करण्याचा सपाटा सुरु केला.
राज्यात आतापर्यंत कमी रकमेची फसवणूक झालेले हजारो अर्ज अजूनही कोणताही गुन्हा दाखल न करता खितपत पडून आहेत. त्या अर्जांमधील फसवणुकीचे रक्कम कोट्यवधीमध्ये पोहचली असल्याची माहिती सायबर पोलिसांकडून मिळाली आहे. सायबर गुन्हेगाराने पाच हजार रुपयांनी फसवणूक केली तर कुणी तक्रार करण्यासही जात नाही किंवा पोलिसांकडे गेल्यास केवळ तक्रार अर्ज घेण्यात येते आणि तक्रारदारांना आल्यापावली परत पाठविण्यात येते. अशाप्रकारे हजारो तक्रारदारांचे कोट्यवधी रुपये सायबर गुन्हेगारांनी घशात घातले आहेत.
हेही वाचा…नागपुरात लोकसभेसाठी अर्जविक्री जोरात, काय आहे राजकीय गणितं?
फेसबुक, इंस्टाग्राम किंवा वॉट्सअपवरून सायबर गुन्हेगारांच्या टोळीतील तरुणी अश्लील मॅसेज पाठवितात. त्यानंतर हळूहळू संवाद वाढवून न्यूड व्हिडिओ कॉलवर बोलण्यास भाग पाडतात. त्याची चित्रफित तयार करून समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन लाखो रुपये उकळले जातात. यात अनेक धनाढ्य आणि व्यावसायिक अडकले असून त्यांनी लाखो रूपये सायबर गुन्हेगारांच्या खात्यात वळते केले आहेत. मात्र, कुटुंब, समाजात बदनामीच्यापोटी तक्रार अर्ज देतात परंतु गुन्हा दाखल करण्यात नकार देत असल्याची माहिती सायबर पोलिसांनी दिली.
हेही वाचा…घड्याळ चिन्हाबाबत न्यायालयाच्या अटींचा नागपूर राष्ट्रवादीला विसर
सायबर गुन्हेगाराने ५ ते १० हजार रुपयांनी फसवणूक केल्याबाबत अनेक तक्रारअर्ज येतात. मात्र, रक्कम कमी असल्यामुळे केवळ पोलिसांत नोंद करण्यासाठीच तक्रार अर्ज देतात. गुन्हा दाखल करण्यास पोलीस तयार असतात पण अनेकवेळा तक्रारदार स्वःताहूनच गुन्हा दाखल करण्यास अनुत्सूक असतो. -अर्चित चांडक (पोलीस उपायुक्त, सायबर गुन्हे विभाग)