लोकसत्ता टीम

वर्धा : शासन विविध भू भागाचे आरक्षण ठरवित असते. त्यानुसारच जमिनीचा विविध कामांसाठी उपयोग करणे शक्य असते. म्हणजे यलो झोन हा निवासी बांधकाम करण्यास, ग्रीन झोन म्हणजे कृषीविषयक तर रेड झोन म्हणजे धोकाप्रवण क्षेत्र असलेला भुभाग समजल्या जात असतो. वेळप्रसंगी अशा झोनचे आरक्षण उठविण्याचा शासन अधिकार अबाधित असतोच.

आता या खेरीज आणखी एक झोन आहे. तो म्हणजे डार्क झोन. म्हणजे त्या ठिकाणी विहिरी व तत्सम कामे करता येणार नाही. वर्धा जिल्ह्यातील आष्टी व कारंजा या दोन तालुक्यात डार्क झोन लागू करण्यात आला होता. केंद्रीय भूजल महामंडळाने २०१५ पासून म्हणजे गत दहा वर्षांपासून या दोन तालुक्यातील ७६ गावात डार्क झोन जाहीर केला होता. परिणामी विहिरी, विंधन विहिरी करण्यास येथील गावांना मनाई करण्यात आली होती. या गावातील भूजल पातळी ही केंद्रीय भूजल मंडळाच्या मानकापेक्षा कमी झाली होती. म्हणून मनाई.

ही मनाई आता मागे घेण्यात आली आहे. म्हणजे बंदी उठली. आता या गावात विहिरीची कामे करता येणार. विहीर खोदण्यास कायदेशीर मनाई असल्याने विहिरी नाही व विहीर नाही म्हणून सिंचनासाठी पाणी नाही. ही गावे त्यामुळे त्रस्त झाली होती. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, मनरेगा धडक सिंचन अश्या योजनेतून विहिरीसाठी अनुदान मिळते. पण मनाई असल्याने या योजणांचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकत नव्हता. जबरीने विहीर खोदली तर गुन्हे दाखल केल्या जात होते. त्यामुळे या मनाईने शेतकरी वर्ग कंटाळून गेला होता.

ही बाब शेतकऱ्यांनी आमदार सुमित वानखेडे यांना सांगून हे संकट दूर करण्याची विनंती केली. त्याची तत्काळ दखल घेत आमदार वानखेडे यांनी पाठपुरावा सुरू केला. केंद्रीय भूजल मंडळ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. नव्याने भूजल सर्वेक्षण करण्याचे निर्देश आले. ते पूर्ण झाले. भूजल मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण झाली. ७६ पैकी ७० गावावरील डार्क झोनची बंदी उठली. केंद्राची त्यास मान्यता मिळाली आणि गावे शापमुक्त झाली. आता शेतकरी लाभार्थी विविध योजणांचा लाभ सिंचन करण्यास घेऊ शकतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार सुमित वानखेडे म्हणतात की, विहीर किंवा बोअर करण्यास मनाई करण्यात आली होती. परिणामी शेतकरी त्रस्त झाले होते. विधानसभा निवडणूक प्रचारात आपण ही समस्या सोडविण्यासाठी जातीने प्रयत्न करू, असे आश्वासन या भागात दिले होते. अखेर हे काम मार्गी लागले, याचा आनंद वाटतो. हजारो शेतकरी सुखावले आहेत. त्यांचा ओलीत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डार्क झोन हटले.