नागपूर: उपराजधानीतील विविध रुग्णालयांमध्ये नागपूरसह राज्याबाहेरील मेंदूज्वर संशयितांच्या मृत्यूचा क्रम सुरूच दिसत आहे. ताज्या घटनेत मेयो रुग्णालयात तेलंगणातील एका मेंदूज्वर संशयित मुलाचा मृत्यू झाला. हा मुलगा कुटुंबियांसह नागपुरात फिरायला आला होता. त्यानंतर काय घडले याबाबत आपण जाणून घेऊ या.
आरोग्य विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार, हा मुलगा कुटुंबीयांसह पर्यटनासाठी नागपुरात विमानाने आला होता. येथे त्याची प्रकृती बिघडली. त्याने उपचार घेतले. परंतु प्रकृती खालवल्याने त्याला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्याचा ३० सप्टेंबरला मृत्यू झाला. त्याचे दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याचे डॉक्टरांच्या प्राथमिक निरीक्षणात पुढे आले. प्रयोगशाळेतील तपासणीत त्याला मेंदूज्वर असल्याचेही प्राथमिकदृष्ट्या पुढे आले. त्यामुळे मुलाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. मृत्यू अंकेक्षणानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, मेयो प्रशासनाकडून या मुलाच्या मृत्यूची माहिती नागपूर महापालिकेला कळवली गेली. त्याला नागपूर महापालिकेतील आरोग्य विभागातील अधिकाऱ्यानेही दुजोरा दिला. नागपुरातील विविध रुग्णालयात आजपर्यंत मेंदूज्वर संशयित म्हणून २० रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी ९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात नागपूर शहरातील दोन रुग्णांसह एकाचा समावेश आहे. एका रुग्णावर उपचार सुरू आहेत.
प्रकरण काय ?
नागपूर जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत अल्पावधीत सनाहयीत मेंदूज्वराचे (अँक्युट एन्सेफॅलायटीस सिंड्रोम) २० रुग्ण आढळले. त्यापैकी ९ मुलांच्या मृत्यूंच्या कारणांचे गूढ कायम आहे. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेतील (एनआयव्ही) तीन सदस्यीय पथकाने शहरातील एक मृत्यू झालेल्या मानकापूर भागातील प्राणी, डासासह इतरही काही नमुने गोळा केले. त्याची चाचणी एनआयव्ही प्रयोगशाळेत केल्यावर मृत्यूचे कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. या रुग्णांमुळे नागपुरात आकस्मिक पोहचलेल्या ‘एनआयव्ही’ च्या पथकामध्ये शास्त्रज्ञ डॉ. विजय बोंद्रे, डॉ. अविनाश देवशतवार, डॉ. सुरेंद्र कुमार यांचा समावेश आहे. तर त्यांच्यासोबत राज्याच्या आरोग्य विभागाच्यावतीने राहुल जगताप, डॉ. प्रेमचंद कांबळे, डॉ. महेंद्र जगताप हेही नागपुरात आले होते.
प्रतिजैविक औषधोपचाराचा सल्ला
सध्या थंडी वाजणे व तीव्र ताप येणारे रुग्ण वाढले असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले. त्यापैकी अनेक रुग्णांत तीव्र सर्दी, खोकलासह इतर लक्षणे आढळत आहे. या पद्धतीच्या रुग्णांना लक्षणानुसार प्रतिजैविक देण्याचा सल्ला पथकातील तज्ज्ञांकडून दिला गेल्याचे सूत्रांनी सांगितले.