नागपूर : आंघोळीसाठी केलेले गरम पाण्याचे पातेले दीड वर्षीय चिमुकल्याच्या अंगावर पडले. त्यात चिमुकला गंभीररित्या भाजला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान चिमुकल्याचा मृत्यू झाला. रेहान आशिष धारगावे असे मृत मुलाचे नाव आहे.
अजनी हद्दीतील प्लॉट नंबर ११, रमानगर, शताब्दी चौक येथे धारगावे कुटुंबिय राहतात. आशिष धारगावे यांचा एकुलता एक दीड वर्षाचा रेहान घरात नेहमीप्रमाणे खेळत होता. त्याची आई घरकाम करत होती. दरम्यान त्याची आई गरम पाण्याचे पातेले घेऊन जात असताना अचानक तिच्या हातातील पातेले पडले. त्यातील गरम पाणी रेहानच्या अंगावर पडले. यात तो गंभीररित्या भाजला.
हेही वाचा – प्रेमदिनी प्रेयसीसाठी सांडले रक्त…मित्राला संपवून तो स्वत:च पोहोचला पोलीस ठाण्यात…
तडफडत असलेल्या रेहानला तातडीने उपचाराकरिता खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २३ दिवस रेहानची जीवन-मृत्यूशी झुंज सुरू होती. परंतु, १२ फेब्रुवारी रोजी तो ही झुंज हरला. या प्रकरणी रेहानचे काका अतूल धारगावे यांनी दिलेल्या सूचनेवरून अजनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.