नागपूर : एकाच क्रमांकावरून सातत्याने फोन करीत अश्लिल शिविगाळ आणि जीवे मारण्याची धकमी देणाऱ्या विरोधात कॉँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच शुक्रवारी नंदनवन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. नंदनवन पोलिसांनी लगेच त्याची गंभीर दखल घेत धमकावणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करून क्रमांकाचा शोध सुरू केला आहे.
एका माध्यमावरील चर्चेत भाग घेताना अतूल लोंढे यांनी रोखठोकपणे कॉंग्रेस पक्षाची भूमिका मांडली होती. तेव्हा पासून लोंढे यांना एकाच फोन क्रमांकावरून सातत्याने धमकी आणि अश्लिल शिविगाळ करण्याचे सत्र सुरू झाले. जीवे मारण्याची धमकी देण्याच्या आशयाचे फोन त्यांना गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. “तू टीव्हीवर जास्त बोलत जाऊ नकोस, नाही तर तुला तिथे येऊन ठार मारेल. तुझा खून करायला मला वेळ लागणार नाही. माझा फोन एका रिंगमध्ये उचलला नाहीस, तर तुला जीवंत ठेवणार नाही. यापुढे जीवंत रहायचे असेल तर ५० लाख रुपये तयार ठेव “अशा आशयाच्या धमक्या देणारे फोन सातत्याने येत असल्याची लेखी तक्रार लोंढे यांनी नंदनवन पोलिस ठाण्यात शुक्रवारी केली.
एकाच क्रमांकावरून धमकी देणाऱ्याचा दूरध्वनी क्रमांक आपण ब्लॉक करून ठेवला असता धमकावणाऱ्याने व्हॉट्सअॅप कॉलवरून पाठलाग केला. तू गद्दार आहेस, अशा आशयाचेही विधान करत त्याने पुन्हा आलल्याला ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार लोंढे यांनी पोलीसांत केली आहे. त्यांनी तक्रारीत धमकावणाऱ्याचा मोबाईल क्रमांकही दिला आहे. त्या आधारे नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल करत क्रमांकाचा शोध सुरू केला आहे.
सरकार सहभागी आहे का?
विचार सहन होत नसेल तर ते सगळे बंद करू टाका. लोकशाही तशी संपलेली आहे. भाजपजवळ जेव्हा तर्कशुद्ध बोलायला काही नसते, आम्ही विचालेलल्या प्रश्नांवर उत्तर नसते, त्यावेळी जातीयवादी या पातळीवर उतरतात . काँग्रेस नेत्यांना, प्रवक्त्यांना या धमक्या नव्या राहिलेल्या नाहीत. सातत्याने हे घडत आहे. गुंडी प्रवृत्तीची लोकं आमच्या जीवावर उठत असताना सरकार शांतपणे बसत असेल तर यात सरकार सुद्धा सहभागी आहे का, अशी शंका येते, असे काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे, म्हणाले.