नागपूर : एकाच्या जमिनीवर दुसऱ्यानेच पीक विमा काढल्याचे प्रकरण अतिशय गंभीर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी विधानसभेत दिले.

विरोधी पक्षाच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना फडणवीस बोलत होते. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होताना माजी कृषीमंत्र्यांच्या आशीर्वादाने बीड जिल्ह्यातील विशेषत: परळीमधील लोकांनी बंजारा समाजाच्या जमिनींवर पीक विमा घेतला आणि कोट्यवधी रुपये हडपल्याचा आरोप केला होता. याबाबत फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांचा १ रुपयात विमा उतरवला जातो आणि उर्वरित रक्कम करदात्यांच्या पैशातून भरली जाते. पण, कोणीही कोणाच्याही जमिनीवर विमा काढत असेल आणि विम्याची रक्कम अशाप्रकारे बोगस पीक विमा धारकांकडे जात असेल तर ते योग्य नाही. याची सखोल चौकशी केली जाईल.

हेही वाचा >>>महाविकास आघाडी म्हणते…सरकारने शेतकरी, कष्टकरी, तरुण, उद्योजकांच्या तोंडाला पाने पुसली !

दरम्यान, अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत भाजपचे धस यांनी बीड, परभणी आणि धाराशीव जिल्ह्यातील बोगस पीक विमा प्रकरणावरून सरकारलाच घरचा अहेर दिला. बोगस विम्याचा परळी पॅटर्न असेही नावही त्यांनी दिले. बंजारा समाजाच्या रामापूर तांडा येथे तब्बल ४ हजार हेक्टरचा विमा काढण्यात आला, असे सांगून तांड्याचे एवढे मोठे क्षेत्रफळ असते काय, असा सवाल त्यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धस यांचा रोख कुणाकडे?

सुरेश धस यांनी कोणत्याही कृषीमंत्र्यांचे नाव घेतले नाही. त्यामुळे माजी कृषी मंत्री दादा भुसे यांनी कृषीमंत्र्याचे नाव घ्या, जेणेकरून गोंधळ होणार नाही, अशी विनंती केली. पण धस यांनी नोटीस दिली नाही. त्यामुळे नाव घेणार नसल्याचे सांगितले. परंतु बोगस पीक विम्याच्या ज्या प्रकरणांचा त्यांनी उल्लेख केला, ती २०२३ आणि २०२४ ची आहेत. हा कार्यकाळ बघता घस यांचा रोख मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे असल्याचे दिसून येते.