नागपूर : राज्यात ७ ऑक्टोबर २०२२ रोजी पावसामुळे विजेची मागणी १८ हजार ७७३ मेगावॅट अशी कमी झाल्याचे नोंदवण्यात आले होते. यावेळी दिवाळीत मागणी वाढणे अपेक्षित असतानाच २६ ऑक्टोबरला दिवाळीतही ही मागणी अठरा हजारांहून कमी म्हणजे १७ हजार ६२३ मेगावॅट नोंदवली गेली. राज्यातील अनेक भागात तापमान घसरल्याने पंखे व इतर विद्युत यंत्रासह कृषीपंपाचाही वापर कमी असल्याने ही मागणी कमी झाल्याचा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

हेही वाचा >>> “…तेव्हा मोदींनीच सर्वात जास्त विरोध केला होता”, ‘त्या’ प्रकरणावरून शरद पवारांनी दिल्या कानपिचक्या

‘स्टेट लोड डिस्पॅच सेंटर’च्या माहितीनुसार, २६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६.३० वाजताच्या सुमारास राज्यात विजेची मागणी १७ हजार ६२३ मेगावॅट होती. त्यापैकी राज्यात शासकीय व खासगी वीजनिर्मिती प्रकल्पांत १२ हजार ९२ मेगावॅटची निर्मिती होत होती. केंद्राच्या वाटय़ातून राज्याला ५ हजार ५३१ मेगावॅट वीज मिळत होती, तर राज्यात निर्मित होणाऱ्या विजेपैकी सर्वाधिक ४ हजार ९५० मेगावॅट वीज महानिर्मितीच्या कोळसा, जलविद्युत, गॅस, सौर ऊर्जा प्रकल्पातून मिळत होती. त्यात सर्वाधिक ४ हजार ३५० मेगावॅट वीज महानिर्मितीच्या औष्णिक विद्युत केंद्रातील होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, खासगी वीजनिर्मिती प्रकल्पातून ५ हजार ९९७ मेगावॅटची निर्मिती होत होती. त्यात अदानी प्रकल्पातील ३ हजार ९१ मेगावॅट, आयडियल १५७ मेगावॅट, जिंदल ६३७ मेगावॅट, रतन इंडिया १ हजार ६० मेगावॅटसह इतरही प्रकल्पातील वीजनिर्मितीचा समावेश होता. दिवाळी हा प्रकाशाचा सण असल्याने घराघरात रोषणाई केली जाते. त्यातही यंदा करोना काळात प्रथमच निर्बंध नसल्याने दिवाळी जास्तच उत्साहात साजरी होत आहे. त्यानंतरही विजेची मागणी कमी आहे. त्याला तूर्तास राज्यातील बऱ्याच भागात तापमान घटल्याने विजेच्या पंख्यासह इतर साधनांचा कमी झालेला वापर, मध्यंतरी बराच पाऊस पडल्याने शेतीतही कृषीपंपाचा कमी झालेला वापर कारणीभूत असल्याचे वीज क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. दरम्यान, राज्यात २७ एप्रिल २०२२ रोजी २७ हजार ३४७ ‘मेगावॅट’ची मागणी होती. यावेळी राज्यात १७ हजार ९७३ ‘मेगावॅट’ची निर्मिती होत होती, हे विशेष.