नागपूर : ज्यांना ज्या जिल्ह्याचे पालक मंत्री पद मिळाले आहे त्यांना त्या जिल्ह्यात नियमित जावेच लागेल जर त्यांना पक्षाच्या कामापेक्षा इतर कामे जास्त असतील तर त्यांनी मंत्रिपद सोडावे, असा दम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पक्षातील मंत्र्यांना आज येथे दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय चिंतन शिबिर आज नागपुरात सुरू आहे. शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पालकमंत्री त्या त्या जिल्ह्यात जात नाहीत, पक्षांच्या जिल्हाध्यक्षांना आणि प्रमुख अधिकारी यांना भेटत नाही. पक्ष कार्यकर्त्यांचे काम करत नाहीत, लोकांशी संवाद साधत नाहीत अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या। यासंदर्भात पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी देखील पालकमंत्री बाबत नाराजी व्यक्त केली आणि केवळ पालकमंत्री पर्यटन म्हणून एक दोन तासासाठी येतात, ते पक्ष हिताचे नाही जर त्यांना पक्षाच्या कामासाठी यायचे असेल तर यावे केवळ पर्यटन म्हणून कृपया करून येऊ नये, असे प्रफुल पटेल म्हणाले.
तोच धागा पकडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील मंत्र्यांना दम दिला आणि ज्यांना ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले त्या जिल्ह्यात त्यांना केवळ १ मे, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी यावेळी नाहीतर नियमितपणे त्या त्या जिल्ह्याचा दौरा करावा लागेल, तेथील पदाधिकाऱ्यांची भेट घ्यावी लागेल आणि लोकांशी संवाद करावे लागेल हे जर त्यांना शक्य नसेल त्यांना इतर कामे जास्त असतील तर त्यांनी खुर्ची खाली करावी असा इशारा ही त्यांनी दिला.
हे शिबीर एम्प्रेस पॅलेस, वर्धा रोड येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये आगामी निवडणुका आणि पक्षाची भविष्यातील दिशा, पक्षाच्या विस्तारासाठीची रणनीती, युवा आणि महिला केंद्रित धोरणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बूथ रचना यांसारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर विचारमंथन केले जाणार आहे. पक्षाची आजवरची आणि भविष्यातील वाटचाल, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व त्यातील यश यावर सखोल चर्चा होणार आहे. या चिंतन शिबिरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारीचा आढावा घेण्यात येईल. नागपूरसह संपूर्ण विदर्भात आगामी निवडणुकांमध्ये यश कसे मिळवायचे, यावर लक्ष केंद्रित केले जाईल.
शिबिरात या मुद्यांवर चिंतन केले जाणार आहे.
युवकांचे बदलते आकांक्षा आणि जीवनशैली, समाजातील विविध घटकांच्या अपेक्षा, तंत्रज्ञान आणि समाज यांचा परस्पर संबंध, शिक्षण, रोजगार, महिला सुरक्षा, आत्मनिर्भरता, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कामगार वर्गाचे हित, पक्षाची विचारसरणी गावागावात पोहोचवण्याचे धोरण, या शिबिरात पक्षाचे वरिष्ठ नेते, मंत्री, आजी-माजी आमदार व खासदार, सर्व सेलचे प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य सहभागी होणार आहेत. हे शिबीर शिव-शाहू-फुले-आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर आधारित प्रगत महाराष्ट्र घडवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.