नागपूर : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षांच्या काळात घरात बसून  केवळ ‘गरम पाणी प्या आणि स्वस्त बसा’ इतकाच सल्ला दिला. त्यामुळे प्रचारसभांमधून आमच्यावर टोमणे मारून तुम्ही केवळ समाधान मिळवू शकता. मात्र, तुम्हाला मते मिळणार नाहीत. आमचा एक प्रवक्ताही तुम्हाला चर्चेत पाणी पाजेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

सक्करदरा चौकात  भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार मोहन मते, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, पीरिपाचे जयदीप कवाडे उपस्थित होते. फडणवीस पुढे म्हणाले, प्रवासात असताना उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकत होतो. त्यांनी  त्यांची अडीच वर्षे आणि आमच्या दीड वर्षाच्या कामांवर वादविवाद करण्यासाठी एका व्यासपीठावर येण्याचे आव्हान दिले. मी उद्धव ठाकरेंना सांगतो, तुम्ही अडीच वर्षे केवळ घरात बसून लोकांना समाज माध्यमांवरून गरम पाणी पिण्याचे सल्ले दिले.

हेही वाचा >>>“वडेट्टीवारांना पक्षात किंमत नाही, स्वतःच्या मुलीसाठी….”, धर्मरावबाबा आत्राम यांनी चित्रफीतच…

तुमच्यासोबत चर्चा आणि वादविवाद करायला भाजपचा एक प्रवक्ताच पुरेसा आहे. आमचा प्रवक्ता बोलला की तुम्ही चार प्याले पाणी पिऊन खाली बसाल. केवळ टोमणे मारून समाधान मिळेल. मात्र तुम्हाला मते मिळणार नाहीत, असेही फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या दहा वर्षातील कामांची माहिती दिली. जयदीप कवाडे यांनीही यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ईश्वर बाळबुधे, आमदार मोहन मते यांचीही भाषणे झाली.

 गडकरी हे मोदींचे सेनापती

नितीन गडकरी यांनी त्यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सेनापती म्हणून देशभर विकासकामे केली. नागपूर शहराचा चेहरा बदलला. ही देशाची निवडणूक आहे. इंडी आघाडीकडे नेता व नीती दोन्ही नाहीत, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.