नागपूर : भाजप केंद्रात आणि राज्यात सत्तेत असल्याने वेगवेगळ्या पक्षातील नेते, कार्यकर्ते या पक्षात प्रवेश करीत आहेत. पक्ष नेतृत्व देखील बाहेरून आलेल्यांना संधी देऊन पक्षाच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. भाजपच्या नागपूर जिल्ह्यातील एका उपसरपंचाने पक्षाला रामराम ठोकला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून भाजपमध्ये काम केले. पक्ष मोठा करुन सत्तेत आणण्यासाठी अनेकांनी कष्ट वेचले. परंतु सत्ता येताच इतर पक्षातील लोक भाजपात येत आहे आणि मूळ कार्यकर्त्यांना मात्र नेते मंडळी डावलत आहे. यामुळे अनेक पदाधिकारी कंटाळले असून अशाच काही कार्यकर्त्यांनी सलील देशमुख यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
सावरगाव सर्कलमधील बानोर पिठारीचे उपसरपंच शेखर पांडे, निलेश पांडे, निखील चौधरी यांच्यासह भाजपाच्या अनेक निष्ठावंतांनी प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नरखेड तालुकाध्यक्ष वैभव दळवी उपस्थित होते. सत्ता आली त्यापक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक जन ईच्छुक असतांना सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता असल्याने अनेक जन त्या पक्षात जाण्यासाठी तयार आहेत. परंतु एखाद्या पक्षात जर नवीन लोकांना संधी दिली तर जुन्या निष्ठावंत लोकांवर अन्याय होतो हे वेगळे सांगण्याची गरज नाही. काटोल व नरखेड तालुक्यात सध्या अशी काहीसी परिस्थिती आहे. यामुळे आगामी काळात भाजपाचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते हे आमच्या पक्षात येणार असल्याचेही सलील देशमुख यांनी सांगीतले.
सध्या राज्यात अनेक महत्वाचे प्रश्न आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात जाहीर सभेत भाजपाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करु असे आश्वासन दिले होते. परंतु त्या आश्वासनांचा विसर सत्तेत येताच विसर पडला आहे. लाडकी बहिणीच्या भरष्यावर सत्ता मिळाली असे महायुतीतील नेते सांगत आहे. परंतु आता त्याच लाडक्या बहिणी आता सावत्र होत असून विविध कारणे देवून त्यांचे नाव यादीतून वगळयाचे काम करीत सत्ताधारी मंडळी करीत आहे. राज्यात करोनाच्या रुग्णसंख्येमध्ये मोठया प्रमाणात वाढत होत आहे. कोरोनामुळे सर्वांत जास्त मृत्यू हे महाराष्ट्रात झाले आहे. परंतु एकाही मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर साधी चर्चा सुध्दा झाली. यावरुन सर्वसामान्याच्या हिताचे या सरकारला काही देणेघेणे नाही असा आरोपही सलील देशमुख यांनी यावेळी केला.