नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (एमपीएससी) बळकट करण्याचे आश्वासन दिले खरे परंतु, सातत्याने रखडत चाललेले निकाल, परीक्षा, निवड प्रक्रिया आणि आरक्षणाच्या गोंधळामुळे राज्यातील स्पर्धा परीक्षार्थी चिंताग्रस्त झाला आहे. आयोगाकडून अंतिम उत्तरतालिका जाहीर झाल्यावर एक ते दोन महिने निकाल दिला जात नसल्याने ‘एमपीएससी’ला नेमके झाले तरी काय?, असाच प्रश्न आता परीक्षार्थी उमेदवार करीत आहेत. विशेष म्हणजे, यासंदर्भात विचारणा करण्यासाठी आयोगाचे सचिव आणि अध्यक्षांना अनेकदा संपर्क करूनही कुणीही यावर उत्तर द्यायलाही तयार नसल्याने संभ्रम वाढत चालला आहे.
राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक अनियमित आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेचे स्वप्न उराशी बाळगून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. मात्र, आयोगाच्या लालफिती कारभारामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सक्षम बनवावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. यावर नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात फडणवीस यांनी ‘एमपीएससी’ला सक्षम करण्याचे आश्वासन दिले. दुर्दैवाने ‘एमपीएससी’चे वेळापत्रक तयार केल्यानंतरही ‘यूपीएससी’प्रमाणे त्याची अंमलबजावणी होत नाही. यात सुधार करण्यावर भर दिला जाईल. तसेच भविष्यात सरळसेवा भरती परीक्षाही ‘एमपीएससी’कडून घेतल्या जाणार असल्याने मनुष्यबळ पुरवठा व सदस्यांची भरती केली जाईल, असेही आश्वासन दिले होते. परंतु, मागे पाठ पुढे सपाट याप्रमाणे आयोगाच्या परीक्षा, निकाल, मुलाखती आणि निवड प्रक्रिया ‘जैसे थे’ स्थितीमध्ये आहे.
सध्याच्या रखडलेल्या परीक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षा २०२३ चा अंतरिम निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. ११ ते १८ मार्च या कालावधीत उमेदवारांना पदांसाठी प्राधान्यक्रम भरण्याची संधी देण्यात आली. मात्र, त्या प्रक्रियेला एक महिना उलटूनही निकाल घोषित करण्यात आलेला नाही. त्यामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता आणि नाराजी वाढली आहे.
‘एमपीएससी’ संयुक्त परीक्षा गट-ब अराजपत्रित पूर्व परीक्षा २०२४चा निकाल जाहीर नाही.
पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा (विभागाची)२०२३ निकाल रखडलेला.
समाज कल्याण उपायुक्त गट अ परीक्षा दोन महिन्यांपासून निकाल रखडलेला.
विद्यार्थी आर्थिक, मानसिक दडपणात
निकाल जाहीर न झाल्याने विद्यार्थी मानसिक दडपणात आहे. विविध परीक्षांच्या निकालासाठी हजारो विद्यार्थी ‘एमपीएससी’च्या मदत केंद्रात रोज संपर्क करतात. परंतु, कुठल्याही निकाल आणि परीक्षांवर तोडगा निघत नसल्याचे चित्र आहे. पुणे, मुंबई अशा शहरांमध्ये राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागत आहे.