लोकसत्ता टीम

नागपूर : विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक वाद सुरू आहे. दोघांकडून परस्परांच्या विरोधात भक्कम पुरावे असल्याचे दावे केले जात आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी दोन्ही नेते नागपुरात जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र व्यासपीठावर आले. मात्र कार्यक्रम संपताच दोघेही जवळ आले. मात्र एकमेकांशी संवाद न साधता निघून गेले.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केंद्र झिल्पा, भोरगड व गाटपेंढरी या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रम सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

आणखी वाचा-नागपुरातील पागलखाना चौकातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन महिलांकडून…

या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख एकत्र येणार असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपानंतर दोघांमघ्ये काही संवाद होतो का याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. दुपारी १२ वाजता कार्यक्रम असल्यामुळे प्रारंभी अनिल देशमुख कार्यक्रम स्थळी आले. काही वेळातच देवेंद्र फड़णवीस यांचे आगमन झाल्यावर दोघेही सोबतच व्यासपीठावर आल्यावर काही अंतरावर आसनस्थ झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने नागपुरातून सुरेश भट सभागृहातून ऑनलाइन पद्धतीने या तीनही प्राथमिक आरोग्य केंद्रांचे उद्घाटन केले. या तीन पैकी दोन प्राथमिक आरोग्य केंद्र अनिल देशमुख यांच्या काटोल विधानसभा क्षेत्रांतर्गत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून या संदर्भात छापलेल्या निमंत्रण पत्रिकेवर स्थानिक आमदार म्हणून अनिल देशमुख यांचेही नाव होते. त्यामुळे अनिल देशमुख या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस सोबत उपस्थित राहतील का याबाबत शक्यता कमी होती आणि तशी चर्चा होती मात्र अनिल देशमुख उपस्थित झाले.

आणखी वाचा-‘कँडल मार्च’द्वारे पूजाला श्रद्धांजली; अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्यक्रमात आशा वर्कर यांना मोबाईल वाटप झाल्यानंतर अनिल देशमुख यांचे भाषण होईल असे वाटत होते. मात्र जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे यांचे भाषण झाले आणि उपस्थित असलेल्या अन्य पाहुण्याच्या भाषणाला फाटा देत उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाषणासाठी आमंत्रित करण्यात आले. फडणवीस यांनी राज्य सरकारकडून महिलांसाठी सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती देत काही नव्याने घोषणा केल्या. आशा वर्करला मानधन वाढीबाबत आदेश निघाला आणि वाढीव पैसे या महिन्यापासून मिळणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. कार्यक्रम संपला आणि देवेंद्र फडणवीस व्यासपीठावरुन बाहेर निघाले असताना अनिल देशमुख त्यांच्या पाठोपाठ निघाले. मध्येच काही आशा वर्करशी फडणवीस यांच्यासोबत संवाद साधला त्यावेळी फडणवीस यांच्या बाजूला अनिल देशमुख उभे होते मात्र त्यांनी एकमेकाकडे बघितले सुद्धा नाही. त्यानंतर दोघेही आपआपल्या गाड्यामध्ये बसले आणि सभागृहातून पुढच्या कार्यक्रमाला निघाले. जवळपास तासभर दोघेही एकत्र असताना दोघांनी ना एकमेकाकडे बघितले ना संवाद न साधला. त्यामुळे सभागृहाच्या बाहेर याची चांगलीच चर्चा रंगली होती.