नागपूर : देशी बनावटीच्या दोन गावठी पिस्तुलसह ग्रामीण भागातल्या एका ढाबा चालकाला काटोल पोलिसांनी सोमवारी बेड्या ठोकत अटक केली. सचिन उर्फ ओमप्रकाश तेजराम गुजवार (३२) असे दोन गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या ढाबा मालकाचे नाव आहे.

सचिन हा काटोल तालुक्यातल्या गोन्ही शिवारात हॉटेल महाकाल नावाने ढाबा चालवतो. त्याने काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातून दोन गावठी पिस्तूल खरेदी केल्याचा सुगावा पोलिसांना लागला होता. यावरून पोलीस त्याच्या हालचालींवर पाळत ठेवून होते. सोमवारी पुन्हा खबऱ्यांमार्फत काटोल पोलिसांना त्याने या पिस्तूल हॉटेलच्या पाठीमागील बाजूस कुठेतरी लपवल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. पथकाने सोमवारी सायंकाळी झडती घेतली असता हॉटेलच्या मागे एका दगडाखाली खड्डा करून त्याने या गावठी पिस्तूल लपवून ठेवल्याचे पोलिसांना आढळले.

पोलिसांनी लगेच हॉटेलचा मालक सचिन गुजलवार याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता शस्त्र अधिनियामांतर्गत गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या. गुंड प्रवृत्तीच्या सचिन विरोधात यापूर्वीही चोरी, विनयभंग, खून, खूनाचा प्रयत्न, अवैध दारू सारख्या गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. सोबतच त्याच्या विरोधात यवतमाळ जिल्हा आणि शहरातही गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी तपासलेल्या अभिलेखावरून आढळले आहे.

आणखी एकाला कोयत्यासह अटक

या घडामोडीत केळवद पोलिसांनीही चोपडे यांच्या रुग्णालयासमोरील एका पटांगणावरून दारूच्या नशेत हातात कोयता घेऊन धुमाकूळ घालणारा गुंड लखन मनोहर उईके (३२, रा. सावळी मोहतकर, सावनेर) याला अटक केली. दारूच्या नशेत असलेला लखन हा रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना कोयत्याचा धाक दाखवून धमक्या देत होता.

अस्वस्थ शेजारामुळे वाढतेय गन कल्चर

जिल्ह्याच्या २१ ग्रामीण हद्दीतून आतापर्यंत सापडलेल्या पिस्तुलांची संख्या आता २८वर गेली आहे. जिल्ह्याशेजारचे मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा ही राज्ये शहरात येणारी बेकायदेशीर शस्त्रे, गांजाची प्रवेशद्वारे आहेत. त्यामुळे पकडलेल्या शस्त्रांपेक्षा अधिक संख्यने भू माफियांकडे शस्त्रे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.