नागपूर : राज्यातील समाजकार्य महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ७ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी देत कर्मचाऱ्यांचा दिवाळी भेट असल्याचा दावा सामाजिक न्याय विभागाकडून केला जात असला तरी या पैशातून काही महाविद्यालयांचे एका महिन्याचे वेतन होणेही कठीण होणार आहे. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या या निर्णयावर कर्मचाऱ्यांची नाराजी आहे.दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना नागपूर विभागासह राज्यातील समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासून वेतन मिळू शकलेले नाही. राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे समाजकार्य महाविद्यालयांना वेतन देण्यात येते. मात्र, अनुदान वेळेत मिळत नसल्याने वेतनही वेळेत होत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वेतनाअभावी कर्मचाऱ्यांना त्यांनी घेतलेले गृह कर्जाचे हप्ते, वाहन कर्जाचे हप्ते, मुलांच्या शाळेचे शुल्क, विम्याचे हप्ते, कुटुंबातील सदस्यांचा औषधोपचार आणि औषधोपचाराचा खर्च आदीं खर्च पूर्ण करण्याकरिता प्रचंड ताण येत आहे. त्यात समाज कल्याण विभागाने नुकतेच त्या संदर्भात तरतूद वितरित केली असून राज्यातील सर्व समाजकार्य महाविद्यालयांना सुमारे ७ कोटी ५५ लाख रुपयाचा निधी मिळणार आहे. हा निधी विभागीय कार्यालयातून जिल्हा कार्यालय व संबंधित महाविद्यालयांच्या कर्मचारी यांना मिळणार आहे.

हेही वाचा : सर्वधर्मसमभाव ही हिंदुत्वाची आधारशिला ; नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

वाटप करण्यात आलेल्या निधीमध्ये मुंबई विभाग १५ लाख, पुणे विभाग १ कोटी ५ लखा, औरंगाबाद विभाग ३० लाख, लातूर विभाग ३० लाख, नागपूर विभाग ३ कोटी २ लाख, नाशिक विभाग १ कोटी ५ लाख व अमरावती विभाग १ कोटी ६७ लाख याप्रमाणे एकूण राज्यासाठी ७ कोटी ५५ लाख २२ हजार रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. मात्र, हा निधी अत्यंत कमी असून यामध्ये महाविद्यालयांना एका महिन्याचे वेतनही मिळणे कठीण होणार आहे. नागपूर विभागातील एका महाविद्यालयाचे उदाहरण घेतले असता त्यांचे तीन महिन्यांचे वेतन रखडले आहे. संपूर्ण नागपूर विभागालाच ३ कोटींचा निधी देण्यात आला. विभागात जवळपास ११ महाविद्यालये आहेत. यातील एका महाविद्यालयाच्या वेतनासाठी एक कोटींहून अधिक निधी लागणार आहे. त्यामुळे अन्य महाविद्यालयांचे काय असा प्रश्न उपस्थित होते आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Difficult pay salaries to employees social work college department of social justice nagpur tmb 01
First published on: 10-10-2022 at 10:31 IST