नागपूर: उपराजधानी नागपुरात मागील काही दिवसांपासून दिवसाचे तापमान उष्ण तर रात्रीचे तापमान तुलनेने कमी असल्याने हवामानात तीव्र फरक जाणवत आहे. या तापमानातील बदलामुळे सर्दी, खोकला, दमा आणि इतर श्वसनविकारांनी त्रस्त रुग्णांची संख्या आधीच वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या धुरामुळे वायूप्रदूषणात मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने, अशा रुग्णांची संख्या आणखी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

श्वसनरोग तज्ज्ञ आणि क्रिम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. अशोक अरबट यांनी यासंदर्भात नागरिकांना इशारा देत सांगितले की, “दिवाळीचा सण आनंदाचा असला तरी फटाक्यांमुळे निर्माण होणारे प्रदूषण आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरते. विशेषतः दमा, सीओपीडी, इंटरस्टेशियल लंग्स डिसिज, तसेच कोरोनानंतर फुफ्फुसांवर परिणाम झालेल्या रुग्णांनी या काळात अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.”

डॉ. अरबट यांनी पुढे सांगितले की, “फटाक्यांमधून निघणाऱ्या धुरात सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रस ऑक्साइड आणि इतर सूक्ष्म धूलिकण असतात. हे घटक फुफ्फुसात जाऊन दमा, खोकला, सर्दी आणि श्वास घेण्यास त्रास निर्माण करतात. या धुराचा परिणाम फक्त श्वसनसंस्थेपुरता मर्यादित नसून, त्वचा, डोळे आणि कानांवरही होतो.”

या प्रदूषणामुळे नागरिकांना घसा खवखवणे, डोळ्यांत पाणी येणे, कानात बधिरता, त्वचेवर खाज येणे अशी लक्षणे दिसतात. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीच फुफ्फुसविकारांनी त्रस्त असलेले रुग्ण हे या धोक्याच्या गटात येतात. डॉ. अरबट म्हणाले, “ऋतू बदलल्याने शरीराला वातावरणाशी जुळवून घेण्यास वेळ लागतो. त्यामुळे या काळात दमा, व्हायरल ताप, अंगदुखी, सर्दी यांसारखे विकार सहज वाढतात. या पार्श्वभूमीवर प्रदूषण हा अतिरिक्त ताण ठरतो.”

दिवाळीत केवळ फटाकेच नव्हे, तर घर रंगवताना वापरल्या जाणाऱ्या रंगांमधूनही काही रासायनिक वायू निघतात, ज्यामुळे श्वसनास त्रास होतो. “घर रंगवताना किंवा सजावट करताना घरातील हवा खेळती ठेवणे आणि शक्य तितका नैसर्गिक रंगांचा वापर करणे अधिक सुरक्षित ठरते,” असेही डॉ. अरबट यांनी स्पष्ट केले.

प्रतिबंधात्मक उपाय काय?

फटाके शक्यतो टाळावेत आणि मुलांना त्यापासून दूर ठेवावे.

घरात हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.

बाहेर पडताना मास्कचा वापर करावा.

पुरेसे पाणी प्यावे आणि सर्दी-खोकल्याकडे दुर्लक्ष करू नये.

दमा किंवा फुफ्फुसविकार असलेल्यांनी नेहमी औषध जवळ ठेवावे आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डॉ. अशोक अरबट काय म्हणतात…

डॉ. अरबट यांनी सांगितले, “आपल्या आनंदी सणाला प्रदूषणाचा आणि आजारपणाचा गालबोट लागू देऊ नका. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण हा प्रकाश आरोग्याचा, स्वच्छतेचा आणि जागरूकतेचा असावा. समाजाने एकत्र येऊन प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी केली, तर ती खरी आरोग्यदायी दिवाळी ठरेल.”