भंडारा : पिसाळलेल्या श्वानांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याच्या घटना दररोज घडत असतानाच भंडारा जिल्ह्यातील परसोडी (तई )येथे पिसाळलेल्या श्वानाने एकाच दिवशी तीन जणांना चावा घेतल्याची घटना घडली आहे. या तिघांनाही सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आले आहे.
रस्त्यावरून जाणाऱ्या तीन जणांना एका पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतला यात एका शालेय विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. सचिन दुधराम ढोके(३६), देवेंद्र अशोक मेश्राम (३५), प्रीती विलास भेंडारकर (६) तिघेही राहणार परसोडी (तई) तालुका लाखांदूर असे जखमींचे नाव आहे. ही घटना रविवारला दुपारच्या दरम्यान घडली.
गावातीलच एका श्वानाने हल्ला चढवीत वाटेत मिळालेल्या व्यक्तींवर बेधडक हल्ला चढविला. यात दोन युवकांसह एका शाळकरी मुलीला गंभीर जखमी केले. गावात एकच दहशत पसरली. पिसाळलेल्या श्वानाचा मात्र त्यानंतर बंदोबस्त करण्यात आला. जखमी भंडारा येथे सामान्य रुग्णालयात वार्ड क्रमांक १७ येथे उपचार घेत आहेत. पालांदूर येथील सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक युवराज खोब्रागडे यांना बातमी कानी पडताचं थेट रुग्णालयात रुग्णांची भेट घेतली. त्यांच्या उपचारांकरिता डॉक्टरांशी चर्चा केली.
सुरक्षितता बाळगा
कुत्रा पाळणाऱ्यांनी श्वानाला प्रतिबंधक इंजेक्शन देऊन सुरक्षितता बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मोकाट श्वानांना सुद्धा स्थानिक प्रशासनाने जेरबंद करून त्यांच्यावर सुद्धा रेबीज इंजेक्शन लावणे गरजेचे आहे.
देवेंद्रला नागपूरला हलविले
देवेंद्र मेश्राम याला जखम खोल पर्यंत असल्याने पुढील उपचारार्थ नागपूर येथे हलविल्याचे कळले आहे. तर सचिन दुधराम ढोके सुट्टी देण्यात आल्याचे समजले.