वर्धा: अदानी हे नाव माहित नसेल असा एकही भारतीय नसेल. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचंड प्रभाव राखून असणारे हे नाव. अदानी उद्योगसमूह विविध बलाढ्य संस्था आपल्या पंखाखाली घेण्याचे कसब राखून असल्याने त्यांचा दरारा पण मोठाच. तर याच उद्योगसमुहाच्या डॉ. प्रीती गौतम अदाणी वर्धेसारख्या छोटया गावात येणार म्हटल्याने भुवया उंचावणारच. त्यात परत मेघे विद्यापीठ हे नाव आल्याने प्रचंड उत्सुकता. मेघे अभिमत विद्यापीठाचा ताबा घेण्यास त्या येत आहेत कां? असाच प्रश्न.
पण सध्या तरी त्यास अधिकृत दुजोरा मिळाला नाही. ६ मे म्हणजे उद्या मंगळवारी दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा होत आहे. त्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. प्रीती अदाणी येत आहेत. त्या अदानी फॉउंडेशनच्या अध्यक्ष आगेत. वार्षिक १०० दशलक्ष डॉलर्सचा खर्च असून अदानी समुहाच्या सामाजिक कल्याण व विकास विभागाची ती शाखा आहे. डॉ. प्रीती या १९९६ पासून संस्थेचे नेतृत्व करतात. त्या स्वतः डेंटिस्ट असून त्यातील करिअर सोडून त्यांनी समाजसेवेस समर्पित केले. डॉ. प्रीती यांच्या नेतृत्वात फॉउंडेशन शिक्षण, आरोग्य आणि पोषण, शाश्वत उपजीविका, हवामान कृती व सामुदायिक विकास या पाच क्षेत्रात कार्यरत आहेत. संयुक्त राष्ट्र संघाच्या उद्दिष्टांशी सुसंगत हे कार्यक्रम असल्याचा दावा फॉउंडेशन करते.
डॉ. प्रीती अदाणी मंगळवारी येणार म्हणून आजपासून मेघे विद्यापीठ परिसर हाय अलर्टवर मोडवर आला आहे. डॉ. प्रीती यांना झेड सेक्युरिटी कव्हर आहे. सोबतच त्यांची आधुनिक शस्त्रसज्ज अशी विदेशी सुरक्षा यंत्रणा पण आहे. आज या यंत्रनेने सर्व परिसर पिंजून काढणे सूरू केले आहे. कुठेही कसलीच त्रुटी असू नये अशी दक्षता घेतल्या जात आहे.
अदानी व मेघे यांच्यातील कथित व्यवहाराबाबत दोन वर्षांपासून चांगलीच चर्चा होत आहे. अदानी समूह सावंगी येथील मेघे वैद्यकीय संस्था ताब्यात घेणार असल्याचे सातत्याने बोलल्या जाते. मात्र तसे काहीच होणार नसल्याचा निर्वाळा संस्थेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिला होता. अदानी समूहाने उत्सुकता दाखविली पण त्यास नकार दिल्याचे सांगितल्या गेले. याच कथित चर्चेच्या ओघात डॉ. प्रीती यांनी सावंगी येथे सहज भेट देण्याची ईच्छा दर्शविली. तेव्हा, असे सहज येण्यापेक्षा कार्यक्रमास या अशी विनंती मेघे समूहाने केल्याचे समजले. म्हणून आता विद्यापीठाचा दीक्षांत समारोहचे औचित्य साधून त्यांना पाहुणे म्हणून बोलावण्यात आले आहे.