दिल्ली ‘एम्स’चे माजी संचालक प्रा. डॉ. एस. सी. मिश्रा यांची नागपूरच्या ‘एम्स’वर नियुक्तीचे संकेत

नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (‘एम्स’) वर्ग २०१८-१९ पासून मेडिकलमध्ये सुरू होण्याची शक्यता वाढली असून त्या दिशेने केंद्र आणि राज्य शासनाकडून पावले उचलली जात आहेत. नागपूर ‘एम्स’चे पालकत्व दिल्ली ‘एम्स’कडे देण्यात येणार असून संस्थेच्या संचालकपदी दिल्ली ‘एम्स’चे माजी संचालक प्रा. डॉ. एस.सी. मिश्रा यांची नियुक्ती होण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून नागपूरमध्ये ‘एम्स’ सुरू होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या समितीने तत्पुरत्या स्वरूपात राज्य कामगार विमा रुग्णालय, होमिओपॅथी महाविद्यालय, मेडिकलसह इतर वास्तूंची मागील वर्षी पाहणी केली होती. या सर्व ठिकाणी पायाभूत सुविधा नसल्यामुळे नागपूरला सत्र २०१८-१९ पर्यंत वर्ग सुरू होणे शक्य नाही, असा अहवाल समितीने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिला होता. त्यानंतर राज्य शासनाने तातडीने पावले उचलून २०१७-१८ मध्ये मेडिकलमध्ये सत्र सुरू करण्याच्या दृष्टीने सुविधा उपलब्ध करून दिल्या. मात्र दिल्लीतील शैक्षणिक समिती पाहणीसाठी नागपूरला आली नसल्याने प्रयत्नांना ब्रेक लागला होता.

दरम्यान, २०१८-१९ मध्ये ५० विद्यार्थ्यांची पहिली तुकडी मेडिकलमध्ये सुरू करण्याला पुन्हा गती मिळाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागपूर ‘एम्स’चे पालकत्व दिल्लीच्या ‘एम्स’कडे देण्यासह दिल्ली ‘एम्स’चे माजी संचालक प्रा. डॉ. एस. सी. मिश्रा यांची नागपूरच्या ‘एम्स’चे संचालक व विशेष कार्य अधिकारीपदी नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती आहे. या संदर्भात लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. ‘एम्स’ला संचालक मिळाल्यावर विविध पदांवरील नियुक्यांसह बांधकाम व शैक्षणिक कामांना गती मिळेल. नागपूरच्या ‘एम्स’चा प्रकल्प हा १५०० ते २ हजार कोटींचा असून याचे बांधकाम अमेरिकेतील कंपनीकडून होणार आहे, हे विशेष.

गंभीर रुग्णांना लाभ

मेडिकलमध्ये ‘एम्स’करिता स्वतंत्र वर्ग, प्रयोगशाळा, प्रशासकीय कार्यालय, रुग्णांकरिता स्वतंत्र खाटा, ‘एम्स’च्या संचालकांकरिता निवासस्थान, प्राध्यापकांना क्वार्टर, विद्यार्थ्यांंसाठी वसतिगृहाची जुळवाजुळव सुरू आहे. ‘एम्स’चे डॉक्टर गंभीर आजार असलेल्या रुग्णांवर उपचार करतील. हे रुग्ण मेडिकलमधून त्यांच्याकडे पाठविले जातील.

नागपूर एम्सचे सत्र २०१८-१९ मध्ये मेडिकलमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. लवकरच दिल्लीची शैक्षणिक समिती यासंदर्भात पाहणी करेल. नागपुरातील ‘एम्स’च्या संचालक व विशेष कार्य अधिकारीपदी दिल्ली ‘एम्स’चे सेवानिवृत्त संचालक डॉ. एस.सी. मिश्रा यांच्या नियुक्तीचे संकेत प्राप्त झाले आहेत. संस्थेची गुणवत्ता चांगली रहावी म्हणून नागपूरच्या ‘एम्स’चे पालकत्व दिल्लीच्या ‘एम्स’कडे दिले जाणार आहे.

डॉ. विरल कामदार, नागपूर ‘एम्स’चे विशेष प्रतिनिधी.