शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) जीवनरक्षण प्रणाली (व्हेंटिलेटर) अभावी एका १७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांची तडका-फडकी उचलबांगडी करण्यात आली असून अधिष्ठातापदाची जबाबदारी डॉ. राज गजभिये यांना सोपवण्यात आली आहे. या प्रकरणात एका सहाय्यक प्राध्यापकावरही कारवाई झाली आहे.

हेही वाचा- जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय नियंत्रण समिती कागदावरच; आयुष्याच्या संध्याकाळी आधारासाठी धावाधाव

वणी येथील १७ वर्षीय मुलीला व्हेंटिलेटर न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात डॉ. सुधीर गुप्ता यांच्यावर वैद्यकीय शिक्षण खात्याने बेजबाबदार वर्तणुकीचा ठपका ठेवत विभागीय चौकशीला मंजुरी दिली आहे. या प्रकरणात औषधशास्त्र विभागातील कंत्राटी सहाय्यक प्राध्यापक डॉ. हरीश सपकाळ यांच्यावरही हाच ठपका ठेवत त्यांच्याही विभागीय चौकशीला मंजुरी मिळाली आहे. या आदेशामुळे मेडिकलच्या औषधशास्त्र विभागात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा- चंद्रपुरात सारस पक्षी आणण्याचा प्रस्ताव

दरम्यान, मेडिकलच्या शल्यक्रिया विभागाचे प्रमुख व नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेले डॉ. राज गजभिये यांची मेडिकलच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी या पदाचा पदभारही स्वीकारला. परंतु डॉ. सुधीर गुप्ता यांना मात्र अद्याप कुठेही पदस्थापना दिली गेली नाही. या प्रकरणात संस्था प्रमुख म्हणून डॉ. गुप्ता यांच्यासह कंत्राटी सहाय्यक प्राध्यापक डॉ. हरीश सपकाळ यांना दोषी धरले गेले. परंतु या प्रकरणात मुलगी दाखल असलेल्या युनिटचे प्रमुख, विभाग प्रमुख, वैद्यकीय अधीक्षकांवर मात्र कोणताही ठपका ठेवण्यात आला नाही. त्यामुळे मेडिकलमध्ये उलट- सुलट चर्चेला पेव फुटले आहे.

हेही वाचा- ‘सीटी-१’ वाघाच्या हल्ल्यात आणखी एका शेतकऱ्याचा बळी

दोन समित्यांकडून चौकशी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणात प्रथम मेडिकलच्या शल्यक्रिया विभागाचे प्रा. डॉ. ब्रिजेश गुप्ता, बधिरीकरणशास्त्र विभागाचे डॉ. वासुदेव बारसागडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार, औषधशास्त्र विभागाचे डॉ. मिलिंद व्यवहारे, मेट्रन वैशाली तायडे यांची समिती गठित करण्यात आली. त्यांनी अहवाल सादर केल्यानंतरही मेडिकल बाहेरच्या डॉ. वैशाली शेलगावकर यांच्या अध्यक्षतेत तीन सदस्यीय समितीकडून चौकशी केली गेली. दोन्ही समित्यांनी कोणत्याही डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवला नाही. यंत्रणेत दोष असल्याचे मात्र त्यांनी आपल्या अहवालात स्पष्ट केले होते.