तुषार धारकर

नागपूर : करोनामुळे संपूर्ण जग हादरले होते. करोनाला प्रतिबंध घालण्यासाठी जगात लसीकरण करायला बराच कालावधी गेला. मात्र, आता भविष्यात अशाप्रकारचा आजार उद्भवल्यास प्राण्यांच्या दुधातून आजारांचा प्रतिकार व लसीकरण करण्याचा प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. करोनावरील लस तयार करणाऱ्या सिरम इन्स्टिटय़ूटचे कार्यकारी संचालक डॉ. उमेश शालिग्राम यांनी नव्या प्रयोगाबाबत माहिती दिली.

रमन सायन्स सेंटरच्यावतीने बुधवारी ‘पँडेमिक प्रिपेर्डनेस’ (साथीच्या रोगाची तयारी) या विषयावर डॉ. शालिग्राम यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी भविष्यातील आजारांवर कशी उपाययोजना करायची याबाबत ते बोलत होते. ‘उपचाराच्या तुलनेत लसीकरणाच्या माध्यमातून साथीच्या रोगाचा अधिक प्रभावी नायनाट करता येतो. करोनाच्या विषाणूसोबत लढा देण्यासाठी विविध लसींच्या माध्यमातून मानवी शरीरात प्रतिपिंडे तयार करण्यात आले. करोनासारखे भयावह आजार भविष्यातही मोठय़ा संख्येत येण्याची शक्यता आहे. अशा आजारांना मात देण्यासाठी पायाभूत सुविधा तयार करणे, नवनवीन संशोधन करणे आदी बाबींवर कार्य सुरू आहे. या अंतर्गत ‘ट्रान्सजेनिक’ प्राण्यांमध्ये प्रतिपिंड तयार करून त्यांच्या दुधाच्या मार्फत मानवी शरीरात त्यांचा शिरकाव केला जाईल. सध्या यावर संशोधन अंतिम टप्प्यात आहे’, असे ते म्हणाले.

हेही वाचा >>>विदर्भाने झारखंडचा धुव्वा उडवला, विजय हजारे ट्रॉफीमध्ये १० गडी राखून विजय

‘‘इंजेक्शन’च्या माध्यमातून लस घेण्यास इच्छुक नसलेल्या लोकांसाठीही ‘बँडेज’ किंवा जिभेच्याद्वारे लसीकरण करण्याचा प्रयोग केला जात आहे. सध्या भारतात एका वर्षांत दहा अब्ज लस तयार करण्याची क्षमता विकसित केली गेली आहे. अमेरिका आणि इंग्लंड देशाच्या तुलनेत भारत याबाबत आघाडीवर आहे, असेही डॉ. शालीग्राम यांनी सांगितले.

असे असेल तंत्रज्ञान

‘ट्रान्सजेनिक’ प्राण्यांमध्ये विषाणूशी लढा देणारे ‘अँटीबॉडी’ तयार करण्यात येतील. बकरीमध्ये मानवी शरीरासाठी सहायक आणि उपयुक्त ‘अँटीबॉडी’ तयार करण्याची क्षमता आहे. त्यामुळे या प्रयोगासाठी बकरीच्या दुधाचा वापर करण्यात येईल. बकरीमध्ये ‘अँटीबॉडी’ तयार करून तिच्या दुधाची पावडर तयार केली जाईल. दुध हा दैनंदिन गरजेचा विषय असल्याने मोठय़ा जनसंख्येपर्यंत हे पोहोचवणे सहज शक्य होईल. भारतासारख्या देशातील लोकांसाठी महागडय़ा लसीच्या तुलनेत हे परवडणारे तंत्रज्ञान ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२८ प्रकारच्या विषाणूंची ओळख

करोनासारखे आजार पसरवण्याची क्षमता असलेल्या २८ विषाणूंची ओळख करण्यात आली आहे. या विषाणूंवर संशोधन सुरू असून त्यांच्यामार्फत आजार पसरवण्याच्या आधीच त्यावरील लस आपल्याकडे तयार राहील. ‘फ्लु पँडेमिक’बाबतही लस तयार करण्यावर संशोधन केले जात आहे. कमी वेळात जास्तीत जास्त लसींच्या निर्मितीवर सिरम इन्स्टिटय़ूटचा भर आहे, अशी माहिती डॉ. उमेश शालीग्राम यांनी दिली.