लोकसत्ता टीम
चंद्रपूर: दारूच्या नशेत पित्याने पोटच्या अवघ्या तीन वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केल्यानंतर स्वतःवर चाकूने सपासप वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची दुदैवी घटना रविवारी पहाटे पाच वाजता जिल्ह्यातील राजोली या गावात उघडकीस आली. यातील मृत बालकांचे नाव प्रियांशु गणेश चौधरी (३) तर पित्याचे नाव गणेश विठ्ठल चौधरी (३१) आहे.
मूल तालुक्यातील राजोली येथील गणेश विट्टल चौधरी हा आपल्या पत्नी काजल आणि मुलासह राजोली येथे राहात होता, हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तो दारू पिऊन घरी आला व पत्नीला बेदम मारहाण केली. पतीच्या मारहाणीला घाबरून पत्नी घरून निघून गेली, घरी स्वतः गणेश आणि मुलगा प्रियांशु राहात होते.
दरम्यान, रविवारी पहाटे ५ वाजता दरम्यान त्याने दारूच्या नशेत मुलगा प्रियांशु याचा गळा दाबून खून केला, आणि स्वत:च्या गळ्यावर चाकुने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळावर मूल पोलीस पोहचून पंचनामा केला असून जखमी गणेश चौधरी याला उपचारार्थ मूल उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. पुढील तपास मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे