नागपूर : नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अचूक पंचनामे करण्यासाठी नागपूर विभागाने प्रायोगिक तत्त्वावर राबवलेल्या ई-पंचनामा प्रयोगामुळे दहा दिवसांत माहिती संकलन शक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर्षी जून-जुलै या कालावधीत नागपूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे नव्या प्रयोगाच्या माध्यमातून करून तसा अहवाल शासनाला सादर करण्यात आला, अशी माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी गुरूवारी दिली. मोबाईल अप्लिकेशन व सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांनी नुकसानीसंदर्भातील माहिती व छायाचित्र अपलोड करण्यात केली. त्यानंतर तहसीलदार, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्यामार्फत केवळ दहा दिवसांत अचूक माहिती शासनाला सादर करणे शक्य झाले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नागपूर जिल्ह्याची माहिती विभागीय आयुक्तांना सादर केली. केवळ पाच मिनिटांत ही माहिती शासनाला सादर करणे सुलभ झाल्याचे बिदरी यांनी सांगितले. विभागात पहिल्यांदाच ई-पंचनामा हा प्रयोग यशस्वी झाला आहे. महाराष्ट्र रिमोट सेंसिंग अप्लिकेशन सेंटर (एमआरएसएसी) यांनी हे सॉफ्टवेअर तयार केले आहे.