चंद्रपूर : प्रदूषित उद्योगांमुळे या जिल्ह्यात जल व वायू प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. माणूस, वन्यजीव प्राणी, जलचर प्राणी तसेच पक्ष्यांच्या जीवाला प्रदूषणामुळे धोका आहे. येथील कर्मवीर मां.सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या अहवालानुसार २०२३ ते २०२५ या कालावधीत त्वचारोगाच्या ७७ हजार ५४३ रूग्णांची तपासणी केली आहे. तसेच अस्थमा ११ हजार ५६८, ऱ्हदयविकार ७ हजार ८३, अतिसार १८ हजार ७०८, डेंग्यु मलेरिया ३ हजार १५१ रूग्णांची तपासणी केली आहे. प्रदूषणामुळे जिल्ह्यात आजार मोठ्या प्रमाणात बळावले आहेत.
वैद्यक महाविद्यालयाच्या एप्रिल २०२३ ते मार्च २०२५ च्या अहवालानुसार हवा प्रदुषण आणि तीव्र उष्णतेमुळे होणारे श्वसन विकार जलप्रदुषण, जलजन्य आजार अस्थमाचे ११ हजार ५६८, हृदयविकार ७ हजार ८३, जलजन्य आजार कॉलरा व अतिसारचे १८ हजार ७०८, श्वसन संबंधीत आजार ५ हजार ७११, मानसिक आजार १हजार ९०२ रूग्णांची तपासणी केली आहे. फुस्फुसाचे क्षयरोग ८२१ रूग्ण, गर्भवती महिलांचे आजार जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीत १ हजार २५४ , जानेवारी ते डिसेंबर, २०२४ या कालावधीत १ हजार ५६० तर , जानेवारी ते २५ जुन २०२५ या कालावधीत ७७४ रूग्ण तपासण्यात आले आहेत. चंद्रपूर महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घातक वायु प्रदुषणात वाढ झाली आहे. शहरात घाण कचरा जाळणे, स्कॉब व ऑटोमोबाईल व्यवसायीक, कॉपर वायर, टायर इत्यादी जाळून घातक वायु प्रदुषण शहरामध्ये होत आहे.
चंद्रपूर शहरच नाही तर जिल्हयातील विविध औद्योगिक आणि नागरी भागामध्ये वाढत असलेल्या वायू व जल प्रदूषणामुळे मानवी आरोग्य व पर्यावरण गंभीर संकटात आहे. या प्रदूषणाचा गंभीर परिणाम फक्त मानवावर नव्हे तर वन्य जीव, पाळीव प्राणी, जलचर व पक्ष्यांवरही झाला असून जिल्हयातील अनेक भागामध्ये नागरीकांना श्वसनाचे व त्वचेचे विकार, डोळयाची जळजळ, सततचा खोकला यासारख्या समस्या भेडसावत आहे. चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव हे कार्यरत झाले असल्यापासुन चंद्रपूर जिल्हयातील औद्योगिक व महानगर क्षेत्रामध्ये खुप मोठ्या प्रमाणात घातक वायु व जल प्रदुषण वाढले आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पर्यावरण समितीचे अध्यक्ष विनय गौडा यांनी स्थानिक प्रदूषण नियंत्रण मंडळाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रदूषणाचा विषय गांभीर्याने घ्यावे असेही या नोटीस मध्ये बजावले आहे. दरम्यान संजीवनी पर्यावरण संस्थेचे राजेश बेले यांनी या प्रदूषणाबाबतची तक्रार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच पर्यावरण मंत्री यांच्याकडे केली आहे. आरोग्याला व जिवाला धोका निर्माण करण्यासारखे काम या अधिका-यांनी केलेले आहे म्हणून या अधिका-यांवर मनुष्यवधाचा फौजदारी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
प्रदूषण करणारे उद्योग
चंद्रपूर तालुक्यातील भटाळी, पद्मापूर, दुर्गापूर, चांदा रयतवारी, लालपेठ वेस्टर्न कोल फिल्ड लि., कोळसा खाण व चंद्रपूर महाऔष्णीक विद्युत केंद्र, में. धारीवा विद्युत केंद्र ताडाळी, में, गोपानी लोह व पॉवर प्रा. लि. ताडाळी, में, ओमाटा वेस्ट लि., ताडाळी, में. ग्रेस इंडस्ट्रीज अॅड पॉवर लि. ताडाळी, में, चमन मेटल लि. ताडाळी व लॉयड्स मेटल अँड एनर्जी लि. घुग्घुस, में. ए.सी.सी. सिमेंट घुग्घुस, २४ कोल डेपो, मे. विमला रेल्वे साईडींग, में. मल्टी ऑरगॅनीक प्रा. लि., चंद्रपूर एम.आय.डी.सी., स्टील ऑथोरिटी इंडिया लि. चंद्रपूर, में, फेरो ऑईल प्लॉन्ट, में. महाराष्ट्र कार्बन, में. के. के. एन्टरप्रायजेस कोळसा पावडर प्रक्रिया, मे. हिंदुस्थान स्काव, में. यंग कंन्स्टक्शन कंपनी हॅट मिक्स प्लॉन्ट, मे. अभिजित केमिकल्स, में. भाटीया कोल वाशरी, में वेस्टर्न कोलफिल्ड लि. ऊर्जानगर , गडचांदूर माणिकगड, अल्ट्राटेक, अंबुजा, दालमिया, चुनखडी खदान, लोह खनिज प्रकल्प मुल, कोल वासरी, गिट्टीघदान, गिट्टी क्रेशर, हॉट मिक्स प्लांट या उद्योगांमुळे प्रदूषणात भर पडली आहे.