वर्धा : फाळणीवेळी भारतात सुरक्षित परतलेले आज देशाच्या विविध भागात स्थिरावले आहेत. ते स्थायी झालेत मात्र तेव्हापासून भारतातच असलेले काही मात्र अद्याप स्थिरावलेले नसल्याचे धक्कादायी चित्र आहे. पिढी दर पिढी काही गावे उन्हाळ्यात रिकामी होतात. ओस पडणारी ही गावे महासत्ता होणाऱ्या देशासाठी लज्जास्पद बाब. आता या गावातील स्थलांतरण सूरू झाले आहे. पाण्याअभावी कोरडी ठक्क पडलेल्या या गावातून आहे त्या साहित्यानिशी व आपले पशुधन सोबत घेत पशुपालक शेतकरी वर्ध्यातील अन्य तालुक्यात व अमरावती जिल्ह्यात स्थलांतरित होतात.
आर्वी व कारंजा तालुक्यातील ही ओसाड पडणारी १५ गावे आहेत. त्यात प्रामुख्याने पशुपालक आहेत. चारा व पाणी नसल्याने स्थलांतर करतात. ही समस्या सातत्याने उपस्थित करणारे भाजप नेते सुधीर दिवे म्हणतात की, ही बाब भूषणावह नाही. गाव सोडण्याची आपत्ती कुणावरही दुर्दैवाने येवू नये. या गावात जलस्तर वाढवणे आवश्यक आहे. आर्वी तालुक्यातील चांदणी, बोथली, सालदरा, गुमगाव,बेढोणा, तळेगाव, किन्हाळा, पांजरा व बोथली. कारंजा तालुक्यातील दाणापूर, बांगडापूर, धमकुंड, माळेगाव, भिवापूर व चोपण. या गावातील शेकडो कुटुंबी उन्हाळ्यात अन्य गावासाठी पायपीट सूरू करतात. प्रामुख्याने ते येळकेळी, आंजी, तळणी व अन्य गावात तसेच अमरावती जिल्ह्यातील धामणगाव, वलसाड व अन्य भागात वळतात. जवळपास ३० ते ४० किलोमीटर दुरवर ते निवासी जातात. प्रत्येक कुटुंबाकडे किमान दहा जनावरे आहेत. पोटच्या पोराइतकीच माया या पाळीव प्राण्यांवर असल्याने गाव सोडण्याशिवाय त्यांना पर्याय नसतो.
सुधीर दिवे यांनी प्रशासनास या गावांची यादी, असणारी कुटुंबे व पाळीव जनावरे याची विस्तृत माहिती देत उपाय करण्याबाबत पाठपुरावा केला. या गंभीर प्रश्नावर बैठक घेण्याची त्यांची विनंती अखेर मान्य झाली. पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत आमदार सुमीत वानखेडे, दादाराव केचे व सुधीर दिवे प्रामुख्याने हजर होते. त्यात या संकटग्रस्त गावासाठी पुढील तीन वर्षाचा आराखडा करण्याचे ठरले. निम्न वर्धा धरणातून पाणी वळविणे, जलस्रोत खोलीकरण, सर्व विभागाच्या आवश्यक त्या योजना या गावात राबविणे, उपाय अंमलाबाबत दर तीन महिन्यांनी आढावा बैठक घेणे, चारा उत्पादन व अन्य निर्णय झाल्याचे समजते. दिवे म्हणतात ही बाब किती गंभीर हे शासनाच्या लक्षात आले हा पहिला टप्पा. आता उपाय व त्याची कसोशीने अंमलबजावणी झाली पाहिजे.
पालकमंत्री डॉ. भोयर म्हणाले की गाव सोडावे लागणे ही दुर्दैवी बाब. पाणी व चारा या पशुपालक बांधवांच्या मूलभूत गरजा. त्यामुळे अल्प व दीर्घकालीन उपाय राबविले जातील. हा भुभाग सुफलाम करण्याचे सर्व ते प्रयत्न सूरू होतील. निश्चित बदल घडेल.