नागपूर : माजी बिशप पी.सी. सिंहच्या घोटाळ्यामुळे चर्चेत आलेल्या ‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’च्या (सीएनआय) विविध कार्यालयांवर ‘ईडी’कडून बुधवारी छापेमारी करण्यात आली. ‘ईडी’च्या पथकाने ‘सीएनआय’च्या नागपुरातील सदर परिसरात असलेल्या कार्यालयावरदेखील धाड टाकली. यावेळी दोन तास शोधमोहीम चालली व विविध कागदपत्रे जप्त करण्यात आली.
हेही वाचा – नागपूरसह विदर्भात अवकाळी पावसाची हजेरी, मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा
मागील दोन आठवड्यांतील नागपुरातील ‘ईडी’ची ही दुसरी मोठी कारवाई आहे. वादग्रस्त बिशप पी.सी. सिंहने ‘सीएनआय’अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये अनेक गैरप्रकार केले. याशिवाय संस्थेच्या जमिनी व इतर आर्थिक बाबींमध्येदेखील भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात मध्यप्रदेश पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पी.सी. सिंहला नागपूर विमानतळावरून अटक केली होती. ‘ईडी’नेदेखील फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात ‘ईडी’ने देशभरातील ११ जागांवर बुधवारी छापे मारले. यात नागपुरातील कार्यालयाचादेखील समावेश होता. ‘सीएनआय’च्या सदर भागातील कार्यालयाची यावेळी झडती घेण्यात आली. यावेळी तेथील विविध कागदपत्रांची तपासणी करण्यात आली व बरीच महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे ‘सीएनआय’च्या नेटवर्कमध्ये खळबळ उडाली.