नागपूर : दुचाकीने आलेल्या दोघांनी एका कारचा पाठलाग करीत पिस्तूलच्या धाकावर ८ लाख ४० हजारांची रक्कम लुटली. ही घटना शनिवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास सर्वात गजबजलेल्या रविनगर चौकाजवळ घडली. पोलिसांनी योगेश चौधरी (४७) रा. रामनगरच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. गस्तीच्या नावावर खानापूर्ती करणाऱ्या पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचे बोलले जाते.

योगेश हे रामनगर येथील नायर कोल्समध्ये वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्यांनी इतवारीतील एका व्यापाऱ्याकडून ८.४० लाख रुपये गोळा केले. संपूर्ण रक्कम पिशवीत ठेवली आणि चालक अमितसह कार्यालयात जात होते. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास रविनगर चौक मार्गे जात असताना पाठलाग करीत आलेल्या दुचाकीस्वार तरुणांनी त्यांच्या कारला ‘ओव्हरटेक’ करून अडविले. कारच्या विंड शिल्डवर दगड मारून काचा फोडल्या. दरम्यान, एका तरुणाने पिस्तूल काढली आणि ड्रायव्हर सीटच्या दिशेने गेले, घाबरलेल्या अमितने पळ काढला. दुसऱ्या बाजूने योगेशही पैशांची बॅग घेऊन पळाले. आरोपीही त्यांच्यामागे धावले.

हेही वाचा – बुलढाणा : “पीक उत्पादन संमिश्र, पावसाळा साधारण; परदेशांचा धोका, पण ‘राजा’ कायम!” भेंडवळच्या घटमांडणीचे भाकीत जाहीर

घाबरल्याने तोल गेल्यामुळे योगेश हे खाली पडले. आरोपींनी त्यांच्याजवळची बॅग हिसकावली आणि दुचाकीवर बसून फरार झाले. योगेश यांनी तात्काळ आपल्या कार्यालयासह पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच अंबाझरी पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके घटनास्थळावर पोहोचली. पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यावरून गुन्ह्याची उकल करणे सुरू असल्याची माहिती आहे.