यवतमाळ : देशात सर्वत्र मतदार याद्यांमधील घोळ आणि बोगस मतदारांचा मुद्दा ऐरणीवर असताना आता शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार याद्या बारकाईने पडताळून बोगस मतदारांचा शोध घेण्याचे आवाहन शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांना केले.

यवतमाळ येथे आयोजित शिवसंकल्प जिल्हा पदाधिकारी प्रशिक्षण शिबिरात ते आभासी पद्धतीने बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आदी उपस्थित होते.

सध्या सर्वत्र मतदार याद्यांमधील घोळाबाबत चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी दक्ष राहून, मतदार यादीत बोगस मतदार नसल्याची खात्री करण्याचे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले. अशी नावे आढळल्यास ती तत्काळ काढून टाकण्यासंदर्भात कार्यवाही करावी, तसेच आपल्या हक्काच्या माणसांची नावे मतदारयादीत आवर्जून टाकून घ्यावी, असे त्यांनी सांगितले. पक्षाने विकसित केलेल्या ‘लक्ष्यवेध’ ॲपद्वारे येणाऱ्या निवडणुकीचे हायटेक नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना महायुतीत लढणार आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. एकत्र संसार करायचा म्हणजे कुरबुरी होतच असतात. त्यामुळे कधी एक पाऊल आपण मागे सरायचे, एक पाऊल त्यांनी मागे सरायचे. पण, आपल्याला महायुती म्हणूनच पुढे जायचे आहे, असे शिंदे म्हणाले.

विरोधकांचा पराभव करायचा आहे, मित्रांचा नव्हे, असा सल्लाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. मित्र पक्षासोबत काम करायचे आहे. समजूतदारपणा दाखवला नाही तर, ‘तुले ना मले, घाल कुत्र्याले’, अशी परिस्थिती होईल, असा इशाराही शिंदे यांनी दिला. राज्यात येणाऱ्या निवडणुका जिंकणारच आहोत, पण गाफील न राहण्याचा सल्ला त्यांनी दिला.

या शिबिराच्या निमित्ताने विजयाचा शिवसंकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले. घरात बसून फोक्या मारणारा मुख्यमंत्री जनतेला आवडत नाही, असा टोला त्यांनी हाणला. अशा लोकांची आता महाविकास आघाडीत दोन पक्षात ढोलकी झाली आहे, अशी टीका त्यांनी केली.

या निवडणुकीनंतरच राज्यातील महामंडळावरच्या नियुक्त्या होणार असून, जे या निवडणुकीत काम करतील अशा पदाधिकाऱ्यांचा महामंडळासाठी विचार केला जाईल, असेही शिंदे यांनी आश्वस्त केले. राज्यातील शेतकरी संकटात आहेत. अशावेळी शिवसेना सामाजिक भान ठेवून नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांसोबत आहे.

शेतकऱ्यांच्या घरातील लग्नकार्याची जबाबदारी शिवसेनेने उचलली असून, शिवसैनिकांना अशा शेतकरी कुटुंबाची माहिती गोळा करण्यास सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनावरील चिंतेचे ओझे, शिवसेनेने आपल्या खांद्यावर घेतले आहे. शिवसेना कायम शेतकरी, सर्वसामान्यांच्या सोबत आहे, असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, मंत्री गुलाबराव पाटील यांनी संपूर्ण राज्यात शिवसैनिक शिवसेनचा भगवा फडकवतील असे सांगितले. पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रास्ताविकपर भाषणात, येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे सांगितले.

मतदारयादीतील घोळ सर्वत्र झाल्याच्या पार्श्वभूमीवर, शिवसैनिकांनी आपल्या भागातील मतदारांची खात्री करून, बोगस मतदार ओळखावे, असे राठोड म्हणाले. कार्यक्रमास आमदार नरेंद्र भोंडेकर, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, जगदीश गुप्ता, सहस्राम कोरटे, संजय रायमुलकर, मनोहर चंद्रिकापुरे, विश्वास नांदेकर, शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, प्रीती बंड आदी, पश्चिम विदर्भ समन्वयक पराग पिंगळे, जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार, श्रीधर मोहोड, जिल्हाप्रमुख गजानन डोमाळे, यशवंत पवार, राजुदास जाधव, समन्वयक संजय हातगावकर, उमाकांत पापीनवार, महिला आघाडी प्रमुख कालिंदा पवार, वैशाली मासाळ आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या घरातील लग्नकार्याची जबाबदारी शिवसेनेची!

राज्यातील शेतकरी संकटात आहेत. अशावेळी शिवसेना सामाजिक भान ठेवून नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांसोबत आहे. शेतकऱ्यांच्या घरातील लग्नकार्याची जबाबदारी शिवसेनेने उचलली असून, शिवसैनिकांना अशा शेतकरी कुटुंबाची माहिती गोळा करण्यास सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनावरील चिंतेचे ओझे, शिवसेनेने आपल्या खांद्यावर घेतले आहे. शिवसेना कायम शेतकरी, सर्वसामान्यांच्या सोबत आहे, असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

खराब हवामानाचा फटका

शिवसंकल्प प्रशिक्षण शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हवामान खराब झाल्यामुळे उपस्थित राहू शकले नाही. मात्र त्यांनी पुणे येथे ‘झूम मिटिंग’द्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधला.