नागपूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही भेट सदिच्छा भेट होती. अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी यापूर्वीच दिली आहे. त्यानंतर ही मोदी- शिंदे भेटीबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे. महायुतीत आलबेल नाही, अशी टीका विरोधी पक्षाकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर भाष्य केले.

बावनकुळे म्हणाले, मोदींना भेटण्यात काहीच गैर नाही. उलट महायुती अधिक मजबूत होत आहे. संजय राऊत हे गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकरी आंदोलनाबाबत बावनकुळे म्हणाले, बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेवराव जाणकर आणि डॉ. अजित नवले यांच्याशी संवाद झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू आहे. शासन सर्व विषयांवर गंभीर असून या विषयावर लवकरच सकारात्मक तोडगा निघेल असेही बावनकुळे म्हणाले.

कुणबी समाजावर अन्याय नाही

ओबीसी जीआरवरील वादासंदर्भात बावनकुळे म्हणाले, “मुख्यमंत्री यांनी ४० ते ४५ ओबीसी नेत्यांची बैठक घेतली होती. हैद्राबाद गॅझेटमधील खऱ्या कुणबी जात प्रमाणपत्रावर आधारित जीआर असून त्यावर संभ्रम निर्माण करणे चुकीचे आहे. खोटे प्रमाणपत्र दिल्यास कारवाई होईल, पण खऱ्या कुणबींवर अन्याय होणार नाही.

हा निव्वळ राजकीय खोटारडेपणा आहे. मतदार यादीवरील आरोपांबाबत बावनकुळे म्हणाले, काहीजण पराभव गृहीत धरून आधीच आरोप करत आहेत. हा निव्वळ राजकीय खोटारडेपणा आहे. महायुतीच्या विजयाविषयी आत्मविश्वास व्यक्त करताना ते म्हणाले, ५१ टक्क्यांहून अधिक मते मिळवून महायुती विजयी होईल. मतदार ठामपणे महायुतीसोबत आहे.

पोलीस कठोर कारवाई करतील

फलटन प्रकरणी त्यांनी सांगितले, कोणीही आरोपी असो, पोलिस कठोर कारवाई करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असल्याने दोषींना शिक्षा होईल असेही बावनकुळे म्हणाले.

ऑपरेशन यु टर्न हा उपक्रम

आज पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी सुरक्षित शहर या अंतर्गत ऑपरेशन यु टर्न हा उपक्रम सुरू केला आहे. त्यांतर्गत नागपूर मध्ये पाच वाहतूक पोलीस चौकीचे उदघाटन झाले असून हा चांगला उपक्रम असल्याचे बावनकुळे म्हणाले.

सिंचन विहिरी मुदत वाढ

पूर्व विदर्भातील सिंचन विहिरी दुरुस्ती थांबल्या होत्या.जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बोलून मुदत वाढ देण्यात आली असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.