नागपूर : अगदी क्षुल्लक कारणावरुन आईने लहान मुलाला मोठ्या मुलावर गोळीबार करुन खून करण्यासाठी प्रोत्साहन दिले. मुलानेही रागाच्या भरात प्राण्यांना मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भरमार बंदुकीतून मोठ्या भावावर गोळ्या झाडून खून केला. ही घटना बुधवारी सकाळी अकरा वाजता सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धापेवाड्यात घडली. इंद्रजीतसिंह छगनसिंह भोंडे (३२, धापेवाडा) असे मृत युवकाचे नाव आहे. सावनेर पोलिसांनी आरोपी आई बिशन कौर भोंडे (५५) आणि मुलगा जगजीतसिंह भोंडे (३०) यांना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रजीतसिंह हा लाकडी पोळीपाट बनवून विक्री करीत होता. तो पत्नी व दोन मुलांसह आईवडिलापासून वेगळा राहत होता. त्याचा भाऊ जगजीतसिंह हा दारुडा आहे. त्याच्या दारुच्या व्यसनामुळे तीन वर्षांपूर्वी पत्नी दोन मुलांसह माहेरी निघून गेली. तेव्हापासून अट्टल दारुडा झाला होता. तो नेहमी मोठा भाऊ इंद्रजीतसिंह व वहिणीला दारु पिण्यासाठी पैसे मागायचा. पैेसे न दिल्यास वाद घालून भांडण करायचा. त्याच्या नेहमीच्या त्रासाला इंद्रजीतसिंह कंटाळला होता. बुधवारी सकाळी जगजीतसिंहने मोठ्या भावाला दारुसाठी पैसै मागितले. मात्र, इंद्रजीतने पैसे देण्यास नकार दिला आणि जेवण करण्यासाठी बसला.

पैसे न दिल्यामुळे चिडलेल्या जगजीतसिंहने घरातून भरमार बंदूक काढली. त्यामध्ये छर्रे भरले आणि भावाच्या दिशेने ताणली.दरम्यान,आई बिशन कौर हिनेही जगजीतला गोळ्या झाडून खून करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे जगजीतने लगेच भावाच्या छातीला बंदूक लावून गोळीबार केला. या हल्ल्यात इंद्रजीत रक्ताच्या थारोळ्यात पडला. बंदुकीचा आवाज आल्यामुळे शेजाऱ्यांनी धाव घेतली. काही वेळातच अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के हे घटनास्थळावर पोहचले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी सावनेर पोलिसांनी गु्नहा दाखल करुन आरोपी बिशन कौर आणि जगजीतसिंहला अटक केली.

अर्धांगिनीच्या मांडीवर सोडला जीव

इंद्रजीतसिंह हा पत्नीसह जेवण करीत होता. दिर जगजीतच्या हातात बंदूक बघून वहिणीने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच पतीलाही सतर्क केले. यादरम्यान, जगजीतने गोळीबार केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या इंद्रजीतला पत्नीने मांडीवर घेतले. त्याला पाणी पाजले. मात्र, आठ ते दहा छर्रे छातीतून घुसल्यामुळे त्याचा पत्नीच्या मांडीवरच जीव गेला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.