Election Commission, नागपूर : मागील काही महिन्यांपासून मत चोरीच्या प्रकरणामुळे निवडणूक आयोग चर्चेत आहे. लोकसभेचे विरोधी पक्षेनेते राहूल गांधी यांनी मत चोरीचा मुद्दा प्रखरपणे मांडला होता. यानंतर देशाच्या विविध राज्यांमध्ये कशाप्रकारे मत चोरी करण्यात आली यावर सादरीकरणही केले. त्यामुळे निवड आयोगावर आरोप झाले आहे. यानंतर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था आणि भविष्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका होणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे.

मात्र, महाविकास आघाडीला मतदान यादीवर अद्यापही विश्वास नाही. त्यामुळे राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह काही नेत्यांनी नुकतीच राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली होती. यावेळी मत चोरी आणि मतदार याद्यांमधील गोंधळावर आरोप करण्यात आले. हा संपूर्ण प्रकार सुरू असतानाच निवडणूक आयोगाचा आणखी एक गोंधळ समोर आला आहे. पदवीधर मतदारसंघासाठी मतदारांची ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. मात्र, उमेदवारांना नोंदणी करताना अडचणी येत आहेत. नोंदणी करताना ‘एरर’ येत असून अर्ज सबमीट होत नसल्याची उमेदवारांची ओरड आहे.

विभागातील पदवीधर मतदार संघासाठी १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या तयार करण्याकरिता कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. ३० सप्टेंबर रोजी मतदार नोंदणीची जाहीर सूचना प्रसिद्ध झाली असून ६ नोव्हेंबरपर्यंत याबाबत दावे स्वीकारण्यात येणार आहे. तर अंतिम मतदार यादी ३० डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या विशेष मतदार नोंदणी मोहिमेत नागपूर विभागातील सर्व पदवीधरांनी सहभाग घेवून नोंदणी करावी, असे आवाहन नागपूर विभागाच्या मतदार नोंदणी अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.

विधानपरिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या नागपूर विभागातील पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी संपत आहेत. या पार्श्वभूमीवर पदवी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून १ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ३ वर्ष पूर्ण झालेल्या पदवीधरांसह सद्या मतदार यादीत नाव समाविष्ट असलेल्या सर्व पदवीधरांसाठी नव्याने मतदार नोंदणी करण्यात येत आहे. यासाठी विभागातील २५६ मतदान केंद्रांवर निवडणूक पदनिर्देशीत अधिकाऱ्यांकडे ही नोंदणीची सोय करण्यात आली आहे.

नुकतेच राज्य मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार ऑनलाईन पद्धतीने मतदार नोंदणीची व्यवस्थाही उपलब्ध होणार असून याची माहिती येत्या काळात देण्यात येईल, असे बिदरी यांनी सांगितले. पदवीधर मतदार नोंदणीसाठी विहित नमुना १८ चा अद्ययावत अर्ज भरणे गरजेचे असून अर्ज मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/Graduates-and-Teachers-Constituencies-२०२५.aspx या संकेतस्थळावर तसेच पदनिर्देशीत अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये उपलब्ध होणार आहे. मात्र, या संकेतस्थळावर नाेंदणी करताना अडचणी निर्माण होत आहेत.