पक्षातील बंडखोरी मोडून काढत काँग्रेसने जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारली असली तरी मंगळवारी होणाऱ्या विषय समितीच्या निवडणुकीतही बंडखोरी होणारच नाही याची खात्री नसल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादीची काही मते फुटली होती. मात्र, त्याचा निवडणूक निकालावर काहीही परिणाम झाला नाही. केदार यांच्या कार्यशैलीवर आरोप करून नाना कंभाले यांनी बंड केले होते. ते शांत झाले. पण मुद्दे कायम आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सभापतीपदासाठी निवडणुका होत आहे. यानिमित्ताने जिल्हा परिषदेवर एक हाती वर्चस्व राखणारे काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या नेतृत्वाची पुन्हा एकदा कसोटी लागणार आहे. काँग्रेस आघाडीकडे स्पष्ट बहुमत आहे. पण बंडखोरीची चिंता आहे. त्यामुळेच सर्व सदस्यांना नागपूरबाहेर पाठवण्यात आले आहे.
हेही वाचा >>>नागपूर : पाच वाघ स्थलांतरित करणार – मुनगंटीवार
बंडखोरी टाळण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. कंभालेंनाही सोबत घेण्यात येत आहे. मात्र अजूनही चित्र स्पष्ट नाही. जि.प.च्या चार विषय समित्यांसाठी मंगळवारी निवडणूक होणार आहे. समाजकल्याण, महिला व बाल कल्याण, कृषी व पशुसंवर्धन आणि शिक्षण व वित्त सभापतींपदासाठी अनेक दावेदार आहेत. यापैकी एक पद राष्ट्रवादीला द्यावे लागणार आहे तर एका पदावर महिलेची निवड केली जाते. त्यामुळे उर्वरित अर्थ व कृषी या दोन समित्यांवर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा >>>नागपूर : अक्कू यादवच्या थरारअंताची कथा आता पडद्यावर
अध्यक्ष, उपाध्यक्षपदी महिलांची निवड झाल्याने सभातीपदासाठी पुरुष जि.प. सदस्यांचा विचार करावा, अशीही मागणी पुढे आली आहे. राष्ट्रवादीकडे आठ सदस्य आहेत, त्यांना दोन सभापतीपद हवे आहे. त्यांनी वेगळी भूमिका घेतली, तर वेगळे चित्र निर्माण होऊ शकते. मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी १ यावेळेत नामनिर्देशनपत्र वाटप व स्वीकारण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता विशेष सभेला सुरुवात होईल. दुपारी ३.५ ते ३.१५ यावेळेत नामनिर्देशनपत्राची छाननी होईल. ३.१५ते ३.३० यावेळेत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. त्यानंतर गरजेनुसार दुपारी ३.४५ वाजतापासून मतदानास सुरुवात होईल.
सदस्यांचे पर्यटन
बंडखोरी टाळण्यासाठी सत्ताधारी गटातील सदस्यांना पर्यटनाला पाठवण्यात आले आहे. सदस्य उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात गेले होते. तेथे जंगल भ्रमण दरम्यान त्यांना व्याघ्र दर्शन झाले. त्यानंतर तीर्थस्थळ जामसावळीला सदस्यांनी भेट दिली. आता एका फार्महाऊसवर त्यांचा मुक्काम आहे. तेथून ते मंगळवारी नागपुरात दाखल होतील.